
सावंतवाडी : संदीप गावडे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेले आरोप हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे आव्हान केसरकर समर्थकांनी दिले. संदीप गावडे हे नाहक दीपक केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी टीका करताना आपली राजकीय उंची पहावी असा पलटवार ही केसरकर समर्थकांनी केला. तसेच गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी आमच्या नेत्यांवर बोलूच नये असा टोला त्यांनी हाणला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर समर्थक बोलत होते.
ते म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघ हा सुसंस्कृत आणि संयमी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोणावर टीका करून आपली राजकीय उंची वाढत नसून ती उलट कमी होते. आजपर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. परंतु, भाजपचे काही पदाधिकारी महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यापुढे जर आमच्या नेत्यांवर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील केसरकर समर्थकांनी दिला.
दरम्यान, दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपली राजकीय उंच पहावी. दीपक केसरकर हे शांत व संयमी नेतृत्व आहे. त्यांना सावंतवाडी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आजपर्यंत ते तीन वेळा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार झालेत. त्यांनी स्वतःच्या नगरसेवकांना देखील निवडून आणलेत. त्यामुळे गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी यापुढे जर केसरकरांवर टीका केली तर आम्ही ती खपवून घेणार नाही असा इशारा भारती मोरे यांनी दिला आहे.