...अखेर गेळेवासियांना स्वातंत्र्य मिळालं !

रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राणेंचे आभार ; संदीप गावडेंच्या लढ्याला यश
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 14:15 PM
views 133  views

सावंतवाडी : गेळे कबुलायतदार जमीन वाटपाचे आदेश स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेत. ही यादी काल सुपुर्द करण्यात आली आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच  पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते काल आदेश वाटप करण्यात आले. गेळे गावातील २५७ कुटुंबांना ५ गुंठे कमर्शियल व ५० गुंठे शेतजमीन अशी ५५ गुंठे प्रत्येकी जमीन मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने गेळे गावास स्वातंत्र्य मिळाल्याचे मत भाजपचे युवा नेते, संदीप गावडे यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री श्री. राणे यांचे आभार श्री. गावडे यांनी व्यक्त केले.‌ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या २८७ हेक्टर जमीनीच गावाच्या हितासाठी व पर्यटनदृष्ट्या आरक्षित सोडून इतर जमीनीच वाटप झालेल आहे. पुढील प्रक्रिया आता सुरू झाली आहे. दरम्यान, खासगी वनाचे शेरे लागलेल्या जमीनीबाबतचा प्रश्न रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून पुर्णत्वास नेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या नावासह त्यांच्या जमीनींच वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी करण्यात आले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य गेळेवासियांना मिळाले असल्याची भावना व्यक्त केली. गावाच्या मुलभूत सुविधा, आरोग्य केंद्र, पर्यटन यासाठी आरक्षित सोडून इतर जागेच वाटप करण्यात आले. ५ गुंठे कमर्शियल व शेत जमीनी ५० गुंठे वाटप करण्यात आले. ३८५ दिवस यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. तसेच शक्तीपीठ महामार्गासाठी १२२ एकर क्षेत्र जात आहे. ही देखील जमीन ग्रामस्थांची होती. त्यामुळे त्याचा मोबदला मिळाला यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. गेळेवासियांचा शक्तीपीठला विरोध नाही. या जमीनीचा मोबदला ग्रामस्थांना मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे. 


दरम्यान, वन क्षेत्र लागलेल्या ३६४ हेक्टर जमीनीच्या बाबतीतला विषय मंत्रालय स्तरावर मार्गी लावू, त्यासाठी रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधू असंही ते म्हणाले. २५७ कुटुंब या गावात आहेत. त्यांना वन क्षेत्राचा प्रश्न निकाली लागल्यावर समसमान क्षेत्र वाटप करण्यात येईल असंही ते म्हणाले. तर कावळेसाद पॉईंट लगतची जागा पर्यटनासाठीच ठेवली आहे. त्यात वाद न करता सुवर्णमध्य काढला आहे. शासनाच्या नावे असलेल्या त्या जमीनाचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास होईल असा विश्वास श्री. गावडे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे सुटत नसलेला प्रश्न आज सुटत आहे. आज ग्रामस्थांना आम्ही न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. भाजपच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गेळे गावाला विकासाच्या दिशेने आम्ही घेऊन जाऊ असा दावा त्यांनी केला. 


यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने गेळे गाव स्वातंत्र्य झाले. हे काम मार्गी लावण्यासाठी रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत होतो. आज त्या लढ्याला यश मिळाले आहे. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो अशी भावना श्री. ढोकरे यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुधिर आडिवरेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

[8/16, 2:10 PM] Vinayak Gaonwas: **