
कणकवली : सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 चा उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र व आरोंदा हायस्कूल आरोंदा व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांना त्यांच्या "सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने" या लोकप्रिय कवितासंग्रहासाठी नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कणकवली येथील मराठा मंडळ हॉल मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव, भारतीय जनताचे संपादक प्रसेनजित डॉ. अनिल धाकू कांबळी, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक व अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ .राजेंद्र मुंबरकर ,आबा मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी विठ्ठल कदम यांनी केले. सदरील पुरस्कार सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवी डॉ .अनिल धाकू कांबळी यांच्या हस्ते कवी प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील काव्यरसिक व साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना कवयित्री संध्या तांबे यांनी "कवीच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील योगदान व प्रत्यक्ष कवितेतून व्यक्त झालेला स्वर यातील साम्य " याबाबत सुस्पष्ट मांडणी केली. तर प्रसेनजित यांनी " फुले आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या आधारे धम्म व्यवस्थेची चिकित्सा केली पाहिजे व भावी काळात नवा बौद्ध समाज जगासमोर आदर्श ठरेल" असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव म्हणाले की, आ.सो.शेवरे हे निव्वळ कविता लिहुन थांबले नाहीत तर कवितेचे संवर्धन करण्यासाठी व नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसद या संस्थेची स्थापना केली. तसेच प्रसंवाद च्या माध्यमातून तत्कालीन नवोदित समजल्या जाणाऱ्या कवींना महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवुन दिला. म्हणुनच आ.सो.शेवरे स्मृती प्रित्यर्थ चा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक विचारवंत व समीक्षक मोतीराम कटारे आणि उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या काव्यसंग्रहाला देण्यात आला. प्रा. सिद्धार्थ तांबे यांची कविता फुले आंबेडकरी जाणिवांचे असुन ती समकालीन प्रश्नाला धीटपणे सामोरी जाणारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्था संपविण्यासाठी धर्मांतर केले. बाबासाहेब यांचे धर्मांतर हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय पुनर्रचना करण्यासाठी होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी होते. त्यामुळे बौद्ध व्यतिरिक्त अनेक दलितांनीही जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. रुपाली कदम हिने सन्मान पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुचिता गायकवाड -कदम यांनी केलं. आभार निवेदक राजेश कदम यांनी मानले.