झरेबांबर इथं संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण

Edited by:
Published on: April 28, 2025 18:16 PM
views 123  views

दोडामार्ग : दोडमार्ग झरेबांबर येथे ढोल, ताषांच्या गजरात शिवमय वातावरण फटाक्यांची आतषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण रविवारी सायंकाळी करण्यात आले. या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास दोडामार्गकरांनी मोठी गर्दी केली होती. 

रविवारी सायंकाळी झरेबांबर तिठा येथील संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. अनेक शिवप्रेमींनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. अनेकांच्या चेहऱ्यावर एक उत्साह पाहायला मिळाला होता. यावेळी मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष उदय पास्ते, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सोनू गवस, वैभव इनामदार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, हिंदुस्थान प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस झरेबांबर – आंबेली ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अनिल शेटकर, ज्येष्ठ नागरिक मधुकर सावंत, शंकर देसाई, हनुमंत देसाई, आयनोडे सरगवेचे माजी सरपंच हर्षद सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, ओमनाथ नाटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.  

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान या प्रेरणेतून धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी शिव पाईकांनी बलिदान मासात झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले हे खरोखरच अत्यंत प्रशंसीय आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ओठावर नाव देखील आले तरी आजही रक्त आपल सळसळत. रस्त्यातून येजा करणाऱ्यांना शंभू महाराजांचा हा पुतळा हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्यांना एक वेगळी ऊर्जा देऊन जाणार आहे असे उद्गार देखील सोहळ्याचे अध्यक्ष उद्योजक ओमनाथ नाटेकर यांनी काढले. 

आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे त्यांना ते परिपूर्ण माहिती असायला हवी यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकात शिवकालीन इतिहास असायला हवा असे म्हापसेकर यांनी सांगितले.सोनेरी अक्षरात लिहावे असा हा आजचा क्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर या ठिकाणी उभारण्यात आला आहे. या ठिकाणाला सध्या झरेबांबर तिठा असे नाव आहे. आता या तिठा चे नामकरण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असे नवीन नामकरण करावे अशी विनंती झरेबांबर सरपंच अनिल शेटकर व ग्रामस्थांकडे केली आहे. 

दरम्यान पुरोहित मनोज वझे, प्रकाश डेगवेकर, गुरुदास मणेरीकर, आशीर्वाद मणेरीकर, मयूर मणेरीकर, शंकर गाडगीळ, नारायण भाटवडेकर यांनी महाराजांची शास्त्रोयुक्त पद्धतीने मंत्रोच्चाराने विधिवत पूजा केली. तर महाराजांच्या पूजेचा मान झरेबांबर येथील ग्रामस्थ केशव गवस व त्यांच्या पत्नीला देण्यात आला. यावेळी झरेबांबर पंचक्रोशीतील अनेक महिलांनी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले. तसेच यावेळी झरेबांबर येथील अंश गोपाल माजीक या चिमुकल्याने शिवगर्जना करून अनेकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गवस यांनी केले तर प्रास्ताविक अमोल गावडे यांनी केले.