
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून समाजाप्रती आपले कर्तव्य नेहमीच जपले आहे. निराधार वृद्धांना आश्रय देण्याच्या त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानने कुडाळ तालुक्यातील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्या जिव्हाळा सेवाश्रमास ११ हजार रुपयांची रोख मदत आणि ५ हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.
जिव्हाळा सेवाश्रम: निराधारांचा आधारवड असुन पिंगुळी येथील पाच एकर जागेत उभा असलेला जिव्हाळा सेवाश्रम हा खऱ्या अर्थाने एक सेवाभावी आश्रम आहे. येथे निराधारांना कुटुंबाचाच एक भाग मानून त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाते. स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. वाचनालय, अन्नदान, आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका सेवा तसेच गोशाळा यांसारख्या अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. या सर्वांगीण कार्याची दखल घेत, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच या संस्थेला मदतीचा हात देत आली आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू असतो. कै. निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, शिल्पा तारी, सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर (मुद्राळे), शरदनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत सेवाश्रमास प्रदान करण्यात आली. सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी यावेळी प्रतिष्ठानकडे इन्व्हर्टरची मागणी केली. सततच्या वीजपुरवठ्याच्या खंडामुळे वृद्धांना अनेक अडचणी येतात. प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करून, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तिसऱ्यांदा जिव्हाळा सेवाश्रमास भेट दिली असता त्यांना एक वेगळाच अनुभव आल्याचे रवी जाधव यांनी सांगितले. सेवाश्रमाचे कार्याध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास आणि सेवाश्रमाच्या उभारणीमागील प्रेरणादायी इतिहास कथन केला.
श्री. बिर्जे यांनी सांगितले की, १९८६ साली ते बेळगावहून सावंतवाडीला कामाच्या शोधात आले होते. त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की, पत्नी आणि लहान मुलांना घेऊन त्यांना काही दिवस आंब्याच्या झाडाखाली संसार करावा लागला. काम मिळाल्यावर हळूहळू परिस्थिती सुधारली. बाळा मोर्य यांच्या मदतीने त्यांना सावंतवाडीतील सालईवाडा येथे एक छोटी खोली मिळाली. जिथे त्यांनी आठ वर्षे काढली. त्यानंतर बांधकाम कंत्राटदाराच्या हाताखाली काम करत असताना, त्यांनी सावंतवाडीतील मोती तलावाच्या दगडी कठड्याचे आणि आदिनारायण मंदिराचे बांधकाम केले. बांधकाम क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली आणि मित्रपरिवाराच्या मदतीने त्यांनी लहान-मोठी कामे स्वीकारण्यास सुरुवात केली. कामाचा व्याप वाढला आणि चार पैसे मिळू लागले. कालांतराने त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी मठ, गोवा आणि कर्नाटकमधील ११ मंदिर-बांधकामे केली. पिंगुळी येथे घर बांधले आणि मुलांना उच्च शिक्षण दिले. या प्रवासात त्यांच्या पत्नीचा त्यांना मोठा आधार मिळाला, ज्यामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकले.
निराधारांप्रती कळवळा आणि सेवाश्रमाची संकल्पना
परिस्थिती सुधारली असली तरी, रस्त्यात दिसणाऱ्या अनाथ आणि निराधार व्यक्तींना पाहून त्यांच्या मनात नेहमीच जुन्या बिकट दिवसांची आठवण येई. "मी स्वतः एकेकाळी असाच अनाथ होतो, पण माझ्यासमोर दिसणाऱ्या निराधारांना आता मी अनाथ होऊ देणार नाही," या विचारातूनच त्यांच्या मनात जिव्हाळा सेवाश्रमाची संकल्पना रुजली आणि त्यांनी हा सेवाश्रम उभा केला. आज या सेवाश्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या येथे २५ निराधार वृद्ध आश्रय घेत आहेत. आतापर्यंत ६० निराधार वृद्धांना त्यांनी स्वतःच्या हातांनी अंतिम संस्कार दिले आहेत.
या संस्थेमध्ये श्री. बिर्जे, त्यांचे दोन मुलगे, एक मुलगी, त्यांची पत्नी आणि एक जिल्हा परिषद निवृत्त कर्मचारी विनामूल्य या निराधार व्यक्तींची सेवा करत आहेत. सेवाश्रमाचा मासिक खर्च सुमारे एक ते दीड लाख रुपये येतो. परंतु दात्यांकडून केवळ ६० हजार रुपये जमा होतात. अशा परिस्थितीत ते स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून हा सेवाश्रम आनंदाने आणि मनोभावे चालवतात. त्यातून त्यांना आत्मिक समाधान मिळते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पुढील सहकार्याची अपेक्षा
श्री. बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि जिव्हाळा सेवाश्रम यांच्यातील हे ऋणानुबंध समाजासाठी एक आदर्श उदाहरण घालून देत आहेत.