
सावंतवाडी : शहर आणि गावांमध्ये निराधार वृद्ध, गरजू विद्यार्थी, इच्छुक युवक आणि गोरगरीब रुग्णांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. प्रा. सुभाष गोवेकर यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेत दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला आहे, तर डॉक्टर संसारे यांनी आश्रमातील निराधार वृद्ध व्यक्तींसाठी तीन हजार रुपये किमतीचे डायपर किट दिले आहेत.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतिश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून जीवननावश्यक वस्तूंचे वाटप, आश्रमांना मदत, शैक्षणिक सहाय्य, व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, औषधोपचार मदत, समाज प्रबोधन आणि व्यसनमुक्तीसारखे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम चालवले जातात. या सेवाभावी कार्याची दखल घेत अनेक दानशूर व्यक्ती संस्थेला मदतीसाठी पुढे येत आहेत. संस्थेने केलेले मदतकार्य नक्कीच गरजूंपर्यंत पोहोचेल, हा विश्वास दात्यांनी व्यक्त केला आहे. प्रा. सुभाष गोवेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे नेहमीच कौतुक केले आहे. त्यांनी संस्थेला मदतीचा हात देत दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे, डॉ. संसारे यांनी संस्थेच्या आश्रमातील निराधार वृद्ध व्यक्तींची गरज ओळखून तीन हजार रुपये किमतीचे डायपर किट संस्थेला सुपूर्द केले.
या दोन्ही दात्यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या या उदार दृष्टिकोनाचे कौतुक केले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळेच संस्थेला आपले सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.