
सावंतवाडी ः समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १२ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे समाज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक कॉ. संपत देसाई (आजरा) असून प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र स्टेट टॅक्सच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ (पुणे) यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी दिली.
शनिवारी, १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलनात अध्यक्षांचे ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर भाषण, ग्रंथ प्रकाशन आणि साहित्यिकांचा गौरव तसेच कवयित्री मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खुले कविसंमेलन
अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कविसंमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या-जुन्या कवींनी काव्यवाचनासाठी सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक असून त्यांचे ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. या पुस्तकाला विविध पारितोषिकेही प्राप्त झाली असून त्यावर विविध भागात चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली होती. कोकणच्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलने उभारली. या सगळ्या पार्श्वभूमीवरच कॉ. संपत देसाई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अंजली ढमाळ या मराठी साहित्यातील अलीकडल्या काळातील एक लक्षवेधी कवयित्री असून त्यांचा शब्दालय प्रकाशनने प्रकाशित केलेला 'ज्याचा त्याचा चांदवा’ हा कवितासंग्रह बहुचर्चित झाला आहे. या संग्रहाला विविध प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्या सध्या पुणे येथे महाराष्ट्र टेस्ट टॅक्सच्या डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत
आहेत.
समाज साहित्य ही चळवळ गेली काही वर्षे तळकोकणात क्रियाशीलपणे कार्यरत आहे. कोकणातील साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देणे त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुणवंत साहित्यिकांचे लेखन उत्तम वाचकांसमोर आणण्यासाठी गुणवत्ता असणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींना पुरस्कार देणे असा उद्देश ठेवून काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर विख्यात इतिहासतज्ज्ञ सिंधुदुर्ग भूमिपुत्र, घटनातज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर इतरही पुरस्कार देऊन उत्तम साहित्य कलाकृती सर्व दूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिष्ठानच्या सदर कामाला महाराष्ट्रातील जाणकार साहित्य रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क - संस्था सहकार्यवाह प्रा. प्रियदर्शनी पारकर - शिरोडा (९४०४९०६५७०) प्रा.संतोष जोईल - फोंडाघाट (९०२११२८१४०)