नांदगाव तिठा परिसरातील अवैध दारु विक्री कायमस्वरुपी बंद करा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2023 16:23 PM
views 112  views

कणकवली : नांदगाव पंचक्रोशीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली पोलीस ठाण्यात नांदगाव तिठा येथील अवैध दारु विक्री विरोधात धरणे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी 'बंद करा बंद करा आणि अनधिकृत दारू विक्री बंद करा' अशा घोषणा देत पोलीस स्थानक परिसर शिवसेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.कायमस्वरुपी अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी,अशी मागणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे करण्यात आली.त्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कारवाईचे आश्वासन दिले.यावेळी शिवसैनिकांनी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा  दिला.


यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, वैदही गुडेकर, माधवी दळवी, निसार शेख, नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर, प्रदीप हरमलकर, सचिन सावंत, सुरेश मेस्त्री, हमाम नावलेकर,लक्ष्मण लोके यांच्यासह आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आदोलकांशी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करताना पोलिसांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रश्नांची सरबत्ती केली. तर आतापर्यंत आलेल्या तक्रारीनुसार तसेच अवैध दारू बाबत व मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईची यादी पोलीस निरीक्षक यांनी शिष्टमंडळासमोर ठेवली. आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करण्याची पुन्हा वेळ पुन्हा येऊ नये. याकरिता संबंधितांवर कारवाई करा. तसेच कुणालाही पाठीशी घातले जाता नये. संबंधित कुणी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आंदोलन झाल्यानंतर पुन्हा दारु विक्री करण्याची कुणाची हिम्मत होता नये, अशी मागणी जिल्हाप्रमुख संदेश पारकर व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली.

दरम्यान अनेक लोकांचे जीव गेले, आता दारू बंद होणार काय? असा सवाल नांदगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला. तर ज्या ठिकाणी दारू विक्री चालू असेल तेथील लोकेशन मला शेअर करा व थेट माझ्याशी संपर्क साधा, कारवाई नाही झाली तर मला विचारा, असे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले. त्यावर माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पोलीस कारवाई करत नसतील तर शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल असे सांगितले