
कणकवली : गेले महिनाभर साकेडी मधील सर्वच वाड्यांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वी तारांवरील झाडांच्या फांद्या तोडण्याची गरज असताना हे काम अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाही. आश्वासने देऊन वीज वितरण वेळ काढू भूमिका घेत असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर न केल्यास ग्रामस्थांतर्फे वीज वितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा साकेडी ग्रामस्थांनी वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना दिला.
साकेडी ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, अजित शिरसाट, संदेश जाधव, राजू सदवडेकर, मंगेश जाधव, मिलिंद जाधव, रवींद्र कोरगावकर, व वीज वितरण चे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत यांच्यासह प्रभारी कनिष्ठ अभियंता ग्रामीण 2 मनीष सावंत आदी उपस्थित होते.
साकेडी गावामधील वीज समस्या गेले महिना भरून अधिक काळ सुरू असून, दिवसभरात सुमारे वीस ते पंचवीस वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असतो. तसेच रात्रीच्या वेळी देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत फोन द्वारे विचारणा केल्यावर मेन लाईनला प्रॉब्लेम आहे असे उत्तर सातत्याने मिळते. सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे ही समस्या नित्याची झाली असून, वीज अधिकारी मात्र याकडे डोळेझाकपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री राऊत यांनी आमच्या जवळ तीन पदांचे कार्यभार आहेत. मनुष्यबळ कमी आहे. असे सांगताच ग्रामस्थांनी तुमची ही नेहमीची कारणे आम्हाला नको. मनुष्यबळ कमी आहे तर ठेकेदारांकडून कामे करून घ्या. आम्हाला आठ दिवसांमध्ये ही कामे मार्गी लावलेली दिसली पाहिजेत. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर श्री राऊत यांनी पावसाने उघडीप घेतल्यानंतर ही कामे करतो असे सांगितले. मात्र पावसाळ्यात तारावरील फांद्या तोडण्याची कामे कशी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. सर्व समस्या या तुमच्या वायरमन सोबत चर्चा करा अशी मागणी ग्रामस्थांनी करताच अखेर गावासाठी असलेले वायरमन प्रकाश देसाई यांच्याशी फोनवर श्री राऊत यांनी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी तारावरील फांद्या तोडण्यासाठी ठेकेदाराची टीम पाठवतो असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी ग्रामस्थांनी वरचीवाडी स्टॉप या ठिकाणी बसविण्यात आलेला नवीन ट्रांसफार्मर हा वरचीवाडीसाठी सुरू करा. या वाडीमध्ये अनेक ग्रामस्थांचे लो होल्टेजचा प्रॉब्लेम असून या लाईनवर तीन वाड्यांना पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची नळ योजना आहे. अनेक बोरवेल वरचे पंप देखील चालत नाही.
तसेच घरातील लाईटही लो असल्याने अनेक उपकरणे जळण्याची ही समस्या उद्भवते. त्यावर श्री सावंत यांनी याबाबत संबंधित ठेकेदार अशी चर्चा करून आवश्यक तो एबी स्विच बसवा व पूर्वीचा असलेला सप्लाय कट करून नवीन सप्लाय जोडून नव्या ट्रान्सफॉर्मवर लोड द्या व त्या वाडीला भेडसावणारी लो होल्टेज ची समस्या सोडवा अशा सूचना दिल्या. उद्या शनिवारी हे काम मार्गी लावण्याची ग्वाही श्री सावंत यांनी यावेळी दिली.