
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास न करणाऱ्या खेड पोलिसांवर हायकोर्टाने ताशेरे ओढले. ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न पोलिसांनी तपास न करताच केला.
दुचाकीस्वार तरुण ट्रकखाली चिरडल्याचे सीसीटीव्हीत दिसत असतानाही पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केले. याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना नुकताच फेरतपासाचा आदेश दिला आहे. याप्रकरणी 4 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल.
खेड तालुक्यातील मुंबई गोवा हायवेवर कळंबणी बुद्रुकजवळ 12 सप्टेंबर 2020 रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन घाटगेचा मृत्यू झाला होता. सचिनची आई आशा घाटगे यांनी अॅड. रेश्मा मुठा, अॅड. सुयोग वेसवीकर आणि अॅड. संदीप आग्रे यांच्यामार्फत हायकोर्टात दाद मागितली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सचिनने हेल्मेट परिधान केले नव्हते व तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता.अपघाताला तोच जबाबदार होता, असा आरोप पोलिसांनी केला. त्यावर आशा घाटगे यांच्यातर्फे अॅड. रेश्मा मुठा यांनी आक्षेप घेत आरोपांचे खंडन केले.
पोलीस तपास दिशाभूल करणारा
दुचाकीस्वार सचिन भरधाव वेगाने ट्रकवर धडकल्याचा पोलिसांनी केलेला दावा चुकीचा आहे. पोलीस तपास दिशाभूल करणारा आहे. सचिन योग्य मार्गिकेवरून आणि कमी वेगाने दुचाकी चालवत होता. यादरम्यान ट्रकचालक पार्किंग लाईट चालू न करता ट्रक मागे घेत होता. ट्रक चालकाच्या चुकीनेच सचिनचा जीव घेतला. 'हॅप्पी ढाबा'च्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी सचिनला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद अॅड. रेश्मा मुठा यांनी केला.
त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतली. न्यायालयाने फटकारताच पोलीस ताळय़ावर आले. त्यांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार करीत अपघाताच्या फेरतपासाची तयारी दर्शवली. सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करू तसेच साक्षीदारांचे जबाब नव्याने नोंदवू, अशी हमी पोलिसांनी कोर्टात दिली.