एस. एम. हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

Edited by:
Published on: February 10, 2025 16:16 PM
views 247  views

कणकवली :  येथील एस.एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. वंदनीय कै.सदानंद पारकर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी.एम.नलावडे होते. यावेळी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे एस. एम. प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन. बोडके, उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान, पर्यवेक्षक जी.ए.कदम व्यासपीठावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन.बोडके यांनी प्रशालेच्या निकालाचा चढता आलेख सांगत उपस्थित विद्यार्थ्यांकडून अशाच उत्तुंग यशाची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आर्या कदम, सान्वी हेळवर, श्रीया मुरकर, शुभदा सावंत, तनिष्का हडकर, जतीन सावंत, अथर्व सावंत, गौरव मिस्त्री, सलोनी पुजारी, हर्षदा पांचाळ, फरीदा नादाब या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावी वर्गशिक्षक एस.डी.बांगर, बी.जे. पावरा यांनी आपल्या मनोगातून अभ्यासामध्ये शिस्त आणि मेहनतीला महत्त्व द्या यश तुमचेच असेल असेल असे प्रतिपादन करून शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक कदम सर यांनी विद्यार्थ्यांकडून घडलेल्या चुका यां  कळत नकळत घडलेल्या असतात.जानून बुजून केलेल्या नसाव्यात.त्यासाठी त्यावेळी शिक्षा केली जाते याबाबत कोणत्याही विद्यार्थ्याने मनात काहीही धरू नये.गुरु शिष्य हे नाते असेच असते हे अतूट राहू दे असे मनोबल वाढवणारे मनोगत व्यक्त केले.उपमुख्याध्यापक आर.एल. प्रधान यांनी आपल्या प्रशालेच्या गुणवंत ,किर्तीवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे दाखले देत तुमच्यामध्येही उर्जा आहे, चांगल्या मित्रांची संगत धरा आणि असेच नामवंत बनून तुम्ही प्रशालेमध्ये या अशा शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या मनोगतामध्ये उपकार्याध्यक्ष काणेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा मनावर परिणाम व्हायला देऊ नका. मेहनत करा यश तुमच्या पायामध्ये लोळण घेत येईल .स्वतःवर विश्वास ठेवा असे सांगितले.  यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्था सचिव डी.एम.नलावडे यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक करत अभ्यासामध्ये जिद्द, मेहनत आणि शिस्त या गोष्टींची परिपूर्ण कास धरल्यास तुम्ही भविष्यामध्ये नामवंत, कीर्तीवंत, मोठे पदाधिकारी होऊन या व्यासपीठावर बसाल यात शंका नाही अशा उच्च ध्येयादी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका एस. एस. तावडे यांनी केले तर आभार संस्कृतीक विभाग प्रमुख एस. सी .गरगटे यांनी मानले.