
कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा- भुपकर वाडी येथील कौल कारखाना नजीक असलेला विद्युत पोल पूर्णतः गंजला असून हा त्रासदायक ठरत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते. या विद्युत पोलवरून ३२ केव्ही लाईन गेली असून यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या भागात १० ते १५ रहिवासी असून गंजलेला विद्युत पोल पडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. परंतु, महावितरण कंपनी या ठिकाणी नवीन विद्युत पोल उभारणीसाठी कानाडोळा करीत असल्याचा आरोप पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक गावडे यांनी केला आहे.
हा गंजलेला विद्युत पोल बदलण्याबाबत महावितरणचे उप कार्यकारी अभियंता जाधव यांना सूचना केल्या आहेत. मात्र, याबाबत महावितरणचे अधिकारी कधी जागे होणार असा सवाल दीपक गावडे यांनी व्यक्त करताना महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी ग्राहकाकडे तगादा लावतात, पण सेवा देताना कामात कुचराई करतात, असाही आरोप केला आहे. तसेच पिंगुळी गावात वीज बिलाची १०० टक्के वसुली असताना महावितरण योग्य सेवा देत नाही, असेही दीपक गावडे यांनी म्हटले आहे.
गंजलेला विद्युत पोल तत्काळ बदलून नवीन पोल उभारावा, अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही दीपक गावडे यांनी दिला आहे. तसेच पोलच्या बाजूस असलेल्या डीपी सुद्धा उघड्या अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी दीपक गावडे यांनी केली आहे.