
सावंतवाडी : पद दिलं की घरी बसायच नाही, तर जनतेसाठी कार्यरत रहायचं या बाळासाहेबांच्या विचारान चालणारा मी शिवसैनिक आहे. त्यासाठी हे संपर्क अभियान आहे. महाविकास आघाडीतून 'जाणीव जागर यात्रा' होत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला दोघांनाही विरोधकांचा पाडाव करायचा आहे. तर स्वतःच अपयश झाकण्यासाठी सत्तेत असताना एकमेकांच्या विरोधात बोंब मारायचं काम भाजप व केसरकर करत आहेत असा जोरदार हल्लाबोल उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला.
ते म्हणाले, प्रत्येकाच्या हृदयात बाळासाहेबांना स्थान आहे. ते अधिक बळकट करण्यासाठी हे अभियान आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यामुळे काम व कार्यातून पदाला न्याय द्यायचा आहे. त्यासाठी हे संपर्क अभियान आहे असं त्यांनी सांगितलं.
तसेच महाविकास आघाडीतून 'जाणीव जागर यात्रा' होत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला दोघांनाही विरोधकांचा पाडाव करायचा आहे. विरोधक विकास करण्यात अपयशी ठरलेत हे या यात्रेतून मांडल जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या यात्रेला माझ्या शुभेच्छा आहेत. स्वतःच अपयश झाकण्यासाठी सत्तेत असताना भांडण दाखवून एकमेकांच्या विरोधात बोंब मारायच काम भाजप व केसरकर करत आहेत. स्वाभिमानी असते तर कधीच राजीनामा देऊन बाहेर पडले असते. शिवसेना पक्षप्रमुखांकडे सावंतवाडीसाठी आम्ही मागणी केली आहे. उमेदवार आमचा असावा आम्ही सांगितले आहे. राष्ट्रवादीकडून अर्चना घारे त्यांच काम करत आहे. महाविकास आघाडीचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील. विरोधकांना पाडायचं हेच आमचं दोघांचं धैय्य आहे असं मत विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.