गद्दारी- विश्वासघाताचे धडे केसरकरांनी अभ्यासक्रमात सामील करून घ्यावेत !

रुपेश राऊळांचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 06:37 AM
views 174  views

सावंतवाडी : गद्दारी, उपकाराची जाण आणि विश्वासघात हे धडे दीपक केसरकर यांनीच लिहिले आहेत. ते आमच्यासह जिल्ह्यातील जनतेने अनुभवलेत. महाराष्ट्राला ते समजावे याकरिता शालेय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पाचवी सहावीच्या शिक्षणात त्यांचा समावेश करावा असा टोला उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी लगावला. तर तवा गरम दिसला की त्याच्यावर पोळी भाजून घ्यायची ही केसरकरांची वृत्ती असून सध्या नारायण राणे यांचा तवा त्यांना गरम दिसत असल्याने ते त्यांच्याशी जवळीक साधून आहेत अशी टीकाही त्यांनी केली.


खासदार विनायक राऊत यांच्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केलेल्या टिकेचा समाचार श्री. राऊळ यांनी घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार मायकल डिसोजा संदीप माळकर उपस्थित होते. श्री राऊळ म्हणाले, केवळ खासदार विनायक राऊत यांच्या शिफारसीमुळे दीपक केसरकर हे मंत्री होऊ शकले. त्यामुळे उपकाराची भाषा केसरकर यांनी बोलू नये. मुळात गद्दारी विश्वासघात धडे आजपर्यंत केसरकारांनीच गिरवले आहेत. त्यांनी राजकीय मित्र असलेले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा राजकीय बळी घेत स्वतः मोठे होऊन कसा मैत्रीचा गळा घोटावावा हे दाखवून दिले. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेत नारायण राणे यांचा उदो उदो करत नगराध्यक्षपद गळ्यात पाडून घेतले‌. पुढे जाऊन ते त्यांच्यावरच उलटले. त्यानंतर माझे राजकीय गुरू म्हणून शरद पवार यांनाही शिष्याची राजकीय चाल कशी आहे हे दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांना देव माणूस म्हणून देवाचा नवस कसा फेडायचा हे दाखवून दिले. एवढेच नाही तर सहकारातही शिवरामभाऊ जाधव यांच्यासोबत गद्दारी केली. त्यामुळे ज्यांच्या जीवावर मोठे व्हायचे त्यांना धडा शिकवायचा ही केसरकर यांची संस्कृती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता गद्दारी विश्वासघात उपकाराची जाण अशा प्रकारचे धडे शालेय शिक्षणमंत्री म्हणून पाचवी सहावीच्या अभ्यासक्रमात आणावेत. खासदार राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे विकासकामे मंजूर झाली त्याच विकास कामांचे नारळ आम्ही फोडले. मात्र, दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकासकामे मार्गी लावली हे सांगावे. रघुनाथ मार्केट येथील प्रकल्प, गार्डनमधील मनोरेले आदी प्रकल्प कुठे आहे ? त्यामुळे केसरकर यांनी विकास कामाबाबत राऊत यांच्यावर बोलू नये.  मुळात चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने केवळ विनायक राऊत यांच्यावर टीका करायची आणि नारायण राणे यांची जवळीक साधायची हाच एक कलमी कार्यक्रम सध्या त्यांनी सुरू केला आहे. तवा गरम दिसला की तिथे पोळी भाजून घ्यायची ही केसरकर यांची वृत्तीच राहिली आहे. सध्या नारायण राणे यांचा गरम तवा बघून ते त्यांच्याशी जवळीक साधत आहेत.