
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांची सिंधूरत्न योजना फसवी असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपात्री खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती देऊ नये म्हणून निधी नसल्याचे कारण सांगून ताडपत्री नाकारल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे केसरकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अन्यथा शेतकऱ्यांस सोबत आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.
तर मळगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचावर कारवाई ही केसरकर यांच्या राजकारणाची बाजू असून त्यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्याला मोठं केलेले नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना साथ देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याचा बोध घ्यावा असा सल्लाही राऊळ यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले,
सिंधू रत्न समृद्धी योजनेअंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेअंतर्गत निंबळे गावातील गजानन बाबुराव पाटकर यांना खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती प्रदान करण्याचे पत्र पाठवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ताडपत्री खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांना या ताडपत्रीसाठी निधी नसल्याचे सांगून माघारी पाठवण्यात आले. याबाबतचे पत्र रुपेश राऊळ यांनी पत्रकारांना दाखवले. कशाप्रकारे सिंधू रत्न समृद्ध योजनेतून फसवणूक केली जाते याचेही उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,
मंत्री केसरकरांनी आजपर्यंत राजकारणात आपल्या बाजूला असलेल्या माणसाला चिरडण्याचे काम केले आहे. याचा अनुभव मला देखील गेल्या आठ वर्षात आलेला आहे, त्यामुळे मळगाव सरपंचांवर केसरकरांनी आणलेला अविश्वास ठरावानंतर तरी भाजपच्या लोकांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विचार करावा. अन्यथा “ये तो अभी सुरुवात है..आगे आगे देखो क्या होता है” असा सल्ला ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी भाजपला दिला आहे. आजपर्यंत केसरकर यांनी राजकारण स्वार्थासाठीच केले आहे. त्यामुळे ते आता निवडणुकीसाठी भाजप पुरेपूर फायदा करून घेतील. मात्र 2025 मध्ये राजन तेली, विशाल परब, संजू परब हे कुठल्या कोपऱ्यात फेकले गेलेले असतील, ते त्यांना देखील कळणार नाही, असा टोलाही यावेळी राऊळ यांनी हाणला. त्यामुळे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अस्तित्वाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.