
सावंतवाडी : 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या मेच्या मासिक कार्यक्रमात ३१ मे रोजी मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉ. रुपेश पाटकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. 'लेखकाशी गप्पागोष्टी' याअंतर्गत ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात सायं. ५ वाजता मुलाखतीद्वारे गप्पा आणि प्रश्नोत्तरे असा हा कार्यक्रम असेल.
'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा चवथा कार्यक्रम आहे. यावेळचा कार्यक्रम आणि पाहुणे आगळेवेगळे आहेत. बांदा येथील मानसोपचार तज्ञ, कार्यकर्ते, लेखक आणि एक संवेदनशील व्यक्तीमत्व डॉ. रुपेश पाटकर यांना रसिक या उपक्रमात भेटणार आहेत. बांदा येथील डॉ. पाटकर हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तर आहेतच, पण त्यांचे सामाजिक कार्य लक्षणीय आहे. मानवी तस्करी, कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य, कार्यशाळांचे आयोजन, कामगार चळवळ, गोव्यातील कातकरी वस्तीत काम, पर्यावरण संरक्षण लढ्यात सहभाग यासह अनेक क्षेत्रात त्यांचे काम आहे. विशेष म्हणजे हे सर्व करीत असताना ते सातत्याने लेखन करतात. विविध दैनिकांत लेख लिहितात. आतापर्यंत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकवाड.मयगृह, मनोविकास, पद्मगंधा अशा नामवंत प्रकाशकांनी त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अशा एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीमत्वाला भेटून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात होणार आहे. मुलाखतीनंतर श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे होणार आहेत.
बदलती जीवनशैली, धावपळ, सवंग करमणूक, मोबाईल चे व्यसन, सामाजिक माध्यमांचा अतिरेकी वापर यामुळे मानसिक रोग, ताणतणाव यांचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुलेही डिप्रेशनला बळी पडत आहेत. यादृष्टीने हा वेगळ्या स्वरुपाचा कार्यक्रम अजिबात चुकवू नका. सोबत किमान एका नवीन साहित्यप्रेमीला घेऊन या. कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करा, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.