विहिंप, बजरंग दलाच्यावतीने रुद्र यज्ञ - रक्षासूत्र बंधन

बजरंग दलामध्ये नोंदणी करण्याचं सीताराम गावडेंचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: July 23, 2025 12:34 PM
views 58  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या गौतस्करी आणि लव्ह जिहाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर जनजागृती आणि हिंदू धर्मरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्र यज्ञ व रक्षासूत्र बंधन असा हा कार्यक्रम असून, यात बहुसंख्य हिंदू बांधवांनी सहभागी होऊन बजरंग दलामध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे, गोरक्षक पंडित दादा मोडक, आणि ॲड. देवदास शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमादरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वाढत चाललेल्या गौतस्करी आणि लव्ह जिहादसारख्या घटनांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात येईल.

      कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेल्या गौतस्करी आणि लव्ह जिहादविरोधात जनजागृती करणे, हिंदू समाजात एकता आणि धर्मबांधवांमध्ये सजगता निर्माण करणे, युवकांना बजरंग दलाशी जोडून धर्मरक्षणाच्या कार्यात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

    या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व बजरंग दल कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपनावर, सावंतवाडी संयोजक साईराज नार्वेकर, आणि सहसंयोजक जितेंद्र रायका यांनी केले आहे.

    तसेच, सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनीही संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येऊन या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदू धर्माचे ऐक्य अबाधित ठेवावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे.