
वैभववाडी : रोटरी क्लबच्या माध्यमातुन तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करून काम करण्यात आले. भविष्यातही याच पद्धतीने रोटरीचे काम सुरू राहणार आहे अशी माहीती रोटरीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी येथे दिली.
श्री.गुळेकर यांची वर्षभरापुर्वी अध्यक्षपदी निवड झाली होती.त्यांचा कार्यकाळ आता संपला असुन त्या दृष्टीने त्यांनी वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडला. ते म्हणाले वर्षभरापुर्वी माझी रोटरी क्लब वैभववाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानतंर रोटरीच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळुन विविध क्षेत्रात काम करताना पिढी घडविण्याचे काम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गेले वर्षभर काम करण्यात आले. श्री.दत्त विद्यामंदीर वैभववाडी, (प्रिंटर व स्कॅनर) केंद्रशाळा खांबाळे (संगणक व प्रिटंर) विद्यामंदीर एडगाव, मांगवली हायस्कूल, प्राथमीक शाळा खारेपाटण (या सर्व शाळांना १ लाख किंमतीचे इंटरॲक्टिव्ह पॅनेल) नडगिवे शाळा (८० हजार रूपये किमंतीच २० बाके) शिडवणे प्राथमिक शाळा (४०,००० किंमतीचा वॉटर कूलर) खारेपाटण शाळा ( ४५ हजार रूपये किमंतीचा प्रिटंर,स्कॅनर आणि इन्व्हर्टर) याशिवाय दुसऱ्या टप्प्यात ५५ हजार रूपये किमंतीचा प्रोजेक्टर देण्यात आला. काही गरजु विद्यार्थ्याना युनिफॉर्म देखील वितरीत करण्यात आले. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्याना पुस्तके वाटप, २०० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, १२५ विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आले.
आरोग्य क्षेत्रात देखील चांगले काम रोटरीच्या माध्यमातुन करण्यात आले. रक्तगट तपासणी,महिला,विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी शिबीरे, रक्तदान शिबीर, मोतीबिंदु शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वितरण, शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्धता असे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता, जलसिंचन अशा अंगाने देखील काम तालुक्यात करण्यात आले. याशिवाय अनेक उपक्रम वर्षभराच्या कालावधीत राबविण्यात आले. या सर्व उपक्रमात रोटरीचे सर्व पदाधिकारी आणि गावागावातील सामाजिक कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चांगले काम करता आले असे देखील श्री.गुळेकर यांनी स्पष्ट केले.