अमली पदार्थ खरेदी विक्रीचे मुळापासून उच्चाटन करा : संदिप मेस्त्री

कलमठ वासियांच्या वतीने संपूर्ण सहकार्य | कारवाई केलेल्या पोलिसांचा ग्रामपंचायतीच्या वतीने करणार सत्कार
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 02, 2023 14:33 PM
views 294  views

कणकवली : गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी वाम मार्गावर जात आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण पोलिसांनी या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचून या अमली पदार्थ तस्करीचा बीमोड करावा अशी मागणी  कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली आहे.

गेल्या काही कालावधीत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गांजा व तत्सम अमली पदार्थ खरेदी विक्री होत असल्याची माहिती पुढे येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी अशाप्रकारे गांजा विक्री करणाऱ्या काही तरुणांवर कारवाई केलेली होती. गेल्या आठवड्यात कणकवली, कलमठ शहरांमध्येही अशाच प्रकारे दोघांवर कारवाई करण्यात आली.  आमली पदार्थांच्या विरोधात पोलीस कारवाई करत आहेत त्याबद्दल त्यांचे आम्ही तरुण कार्यकर्ते म्हणून अभिनंदन करतो , मात्र या अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीमध्ये पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. यात परराज्य व परजिल्हातून हे अमली पदार्थ जिल्ह्यातील गावागावापर्यंत पोहोचत आहेत. या अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी असलेली साखळी पोलिसांनी शोधून काढून त्यांच्या म्होरक्यापर्यंत पोहोचल्यास याचा बिमोड करणे शक्य होणार आहे.

गेल्या काही कालावधीत नवतरुण या अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसतात. या विळख्यात एकदा सापडल्यानंतर हे तरुण व त्यांचे कुटुंबीय मोठ्या अडचणीत येतात. येणाऱ्या पिढीला या अमली पदार्थापासून असलेला धोका टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.  कलमठ गावात देखील अनेक दिवस या गोष्टीचा गावातील अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तश्या तक्रारी देखील ग्रामसभेत आल्या, त्याच वेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून अमली पदार्थ विरोधी ठराव घेऊन कडक कारवाई करण्याची अपेक्षा ग्रामसभेत व्यक्त केली.  पोलिसांनी स्वतंत्र पथकामार्फत या साऱ्याच्या मुळापर्यंत जाऊन या रॅकेटचा पर्दाफाश करावा व जिल्ह्यातून अमली पदार्थ खरेदी विक्री बंद करावी  त्यासाठी संपूर्ण सहकार्य  आम्ही तरुण कार्यकर्ते म्हणून पोलीस प्रशासनाला करू असे संदिप मेस्त्री म्हणाले.