
रोहा : रोटरी क्लब ऑफ रोह्याचा अध्यक्ष होणे हे माझ्यासाठी अत्यंत भूषणावह आहे. मला मिळालेला एक वर्षाचा कालावधी अतिशय स्मरणीय ठरणार असेच काम करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन समाजाचे हित साधणार, शिक्षण,पर्यावरण यांसह सर्वच घटकांसाठी काम करण्याचा संकल्प आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ रोह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी केले.
रोह्यात जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. गव्हर्नर असि. संजय नारकर यांनी रोटरी क्लबची बांधिलकी ही सामान्यांशी आहे, तळागाळातील सामान्यांच्या प्रश्नांशी आहे, अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब यापुढे अधिक प्रभावी काम करेल अशी भावना व्यक्त केली.रोटरी क्लबचे ब्रीदवाक्य 'युनिटी फॉर गुड'असे आहे. याप्रमाणे सर्व क्षेत्रातील सामाजिक हिताचा ध्यास घेतलेले मान्यवर एकत्र आले,त्यामुळे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रविवारी दिमाखदार साजरा झाला.समाज प्रबोधन झाले.मावळत्या कार्यकारिणीने वर्षभर राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण रक्षण उपक्रमांचा आढावा घेत कार्य निरंतर सुरु राहण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या हाती पदभार सुपूर्द करण्याचा सोहळा न भूतो न भविष्याती असाच झाल्याचे अधोरेखित झाले आहे.
या कार्यक्रमाला असि. गव्हर्नर संजय नारकर, माजी अध्यक्ष किरण ताठरे,प्रदीप चव्हाण, नवनिर्वाच अध्यक्ष राजेंद्र पोकळे,जयदेव पवार, भूषण लुमन उपस्थित होते.असि. गव्हर्नर संजय नारकर यांचे प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष किरण ताठरे, सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार वरुण दिवाण यांचेकडून राजेंद्र पोकळे यांनी नवे अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी रोटरीच्या परंपरेनुसार उल्लेखनीय विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यात अमेरिका आंतरराष्टीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले सानेगाव येथील नवनीत मोरे,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी निवड झालेले मिलिंद अष्टीवकर,राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य अतुल साळूंखे, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीनिवास वेदक, प्राणीमित्र कुमार देशपांडे,हक्काचा माणूस माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मुंबई मेट्रो चालवणारी रोह्याची कन्या गार्गी ठाकूर,पर्यावरण प्रेमी राजेंद्र जाधव, प्रख्यात रांगोळीकार रुपेश कर्णेकर,रोह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील, किक बोक्सिंगमध्ये आंतराष्ट्रीय पदकप्राप्त प्रभात पोकळे, परी महाडिक,पत्रकारितेतील रामनरेश कुशवाह,सागर जैन, निसर्ग संस्था यांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्राणीमित्र कुमार देशपांडे यांना प्राणी सेवेसाठी रोख रुपये २५ हजारची मदत करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी नेहमीच मदतीसाठी पुढे राहील असे आश्वासीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर गुरुजी, रोटेरियन स्वप्नील धनावडे यांनी मार्मिकपणे केले तर आभार प्रदर्शन रोटेरियन दिनेश जैन यांनी केले.