खळबळ ! रोह्यात अघोरी विद्येचा दुसरा प्रकार उघड !

Edited by: शशिकांत मोरे
Published on: December 13, 2023 19:11 PM
views 89  views

रोहा :   धामणसई हद्दीतील स्मशानात नग्न पूजेतून पैशाचा पाऊस पाडण्याचा जादूटोण्याचा प्रकार सप्टेंबर महिन्यात उघड झाला होता. लहान मुलांच्या शाळेत रात्रौ पैशाचा पाऊस पडेल या बतावणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ख्यातनाम मांत्रिकाच्या मार्गदर्शनाखाली ही धक्कादायक घटना घडणार होती. त्यासाठी नरबळीचाही प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त झाला होता. मात्र हा संतापजनक प्रकार गावकऱ्यांनी समोर आणत सहभागी काहींना पोलिसांकडे स्वाधीन केले, ही काळया जादूची घटना ताजी असतानाच बुधवारी आरे बुद्रुक हद्दीतील स्मशानभूमीत काळया कपड्यात बांगड्या, नारळ, लिंबू, हळद, कुंकू असे जादूटोण्याचे साहित्य आढळून आल्याने रोह्यासह संबंध जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली.

दरम्यान, अघोरी विद्येचा दुसरा प्रकार समोर आल्याने रोहा तालुक्याला अघोरी विद्येसाठी केंद्र बनविले काय, नेमके कोण आहेत हे तांत्रिक मांत्रिक, त्यांना बळी पडणारे शिक्षीत, अशिक्षीत, अखेर रोह्यात नेमके काय चालले आहे ? याचा शोध रोहा पोलिसांनी घेऊन काळ्या विद्येतील म्होरक्यांना अटकाव करावा अशी मागणी झाली आहे, तर जादूटोण्याचा दुसरा प्रकार समोर आल्याने स्मशानभूमीत नेमके काय चालले होते, काही अघटीत घडणार नव्हते ना ? अशी भितीदायक चर्चा सुरू झाली आहे.


महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांसह तथागत बुद्ध, महात्मा चार्वाक, संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, नरेंद्र दाभोळकर आदी समाज सुधारकांचा आहे. आजही विज्ञानयुगात जादूटोणा काळी जादू, त्यातून पैशाचा पाऊस अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वतःला शिक्षीत समजणारे लोकही अशा कर्मकांडाना बळी पडत असल्याचे वारंवार समोर आले. धामणसई हद्दीतील काळया जादू प्रकरणात शिक्षीत तरुणही सहभागी असल्याचे समोर आले. लहान मुलांची शाळा पैशाचा पाऊस पाडण्यासाठी देण्यात आली. एवढेच काय ? बडे नेतेही एकेकाळी काळ्या कांड्या जादू करण्यात आघाडीवर होते, हेही यानिमित्त पुन्हा चर्चेत आले.

धामणसई हद्दीतील जादूटोण्याची घटना ताजी असतानाच आता आरे बुद्रुक हद्दीतील स्मशानभूमीत जादूटोण्याचे भयानक साहित्य दिसून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. माजी सरपंच सुधाकर यांनी श्मशानभूमीत काही अघोरी तंत्रमंत्राची साहित्य असल्याचे निर्दशनात आणले. काळ्या कपड्यात निळ्या रंगाचा बांगड्या, नारळ, लिंबू, हळद, कुंकू व इतर आढळून आले. रात्रौ स्मशानभूमीत काळ्या जादूने विधी केल्याचे स्पष्ट दिसून आले. हा प्रकार समोर येताच गोफण विभाग यांसह सबंध जिल्ह्यात जादूटोण्याची पुन्हा नवी चर्चा सुरू झाली.

स्मशानभूमीत काय तंत्रविद्या करण्यात आली, याचे तर्कवितर्क सुरू झाले. काळ्या विद्येचा हा धक्कादायक दुसरा प्रकार समोर आल्याने आजही ग्रामीणात भगतगिरी जोरात चालू आहे. त्याला पूर्णतः आळा घालण्यात रोहा पोलिसांना यश मिळाले नाही. त्यातून पैशाचा पाऊस, नग्न पूजा यातून सामान्यांची होणारी आर्थिक लूट अविरत चालू आहे. नग्न पूजेतील पैशाच्या पावसासाठी नरबळी देण्याचा तंत्रविद्येत उल्लेख आहे हे भयान वास्तव विचारात घेता आतातरी रोहा पोलिसांनी जादूटोना प्रकाराच्या मुळाशी जावे, त्यातील म्होरक्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आता आरे बुद्रुक हद्दीतील स्मशानभूमीत दिसून आलेला जादूटोण्याची घटना नेमकी काय आहे, हे लवकरच तपासातून समोर येईल, यावर पोलीस नेमकी काय कार्यवाही करतात, घटनेचा शोध घेतात ? हे पाहावे लागणार आहे.