
सावंतवाडी : शहरातील नवीन शिरोडा नाका ते आयटीआय पर्यंत गॅस पाईप लाईनने खोदाई करून खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पालिका प्रशासनाचे लक्षवेधताच प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करताना नव्याने डांबरीकरण केले. पालिका प्रशासनाच्या कार्यतत्परतेबाबत गोंदावळे यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे आभार व्यक्त केले.
पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या बाजूने गॅस पाईप लाईनने खोदाई करत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी केली होती. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या खोदलेल्या चरामध्ये गाडी रुतण्याचे प्रकार घडले होते. नवीन शिरोडा नाका ते आयटीआय या रस्त्यावर मधोमध खोदाई केल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. वारंवार यामुळे या ठिकाणी अपघातासारखे प्रकार घडत होते. या संदर्भात तेथील रहिवाशांनी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचे लक्ष वेधले होते. गोंदावळे यांनी तेथील रहिवाशांसमवेत रस्त्याची पाहणी करत पालिकेचे मुख्याधिकारी श्री साळुंखे यांचे लक्ष वेधले होते. मुख्याधिकारी साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन रस्त्याचे पाहणी केली होती.
वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता साळुंखे यांनी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याच्या सूचना पालिकेच्या बांधकाम विभागाला दिल्या. त्यानंतर या रस्त्याचे काम आज हाती घेऊन नव्याने डांबरीकरण करण्यात आले. नवीन शिरोडा नाका परिसरात शाळा, हाॅस्पिटल, शासकित कार्यालये आदी येत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे ठराविक ठिकाणी तीन गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी रहिवाशाच्यावतीने गोंदावळे यांनी मुख्याधिकारी यांच्याजवळ केली होती. ही मागणीही पुर्ण करताना तीन ठिकाणी गतिरोधकही टाकण्यात आले. एकूणच रस्ता वाहतुकीस योग्य बनल्याने रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले.