
वैभववाडी : तालुक्यातील मांगवली गावातील प्रमुख तिन्ही रस्ते खड्डेमय झाले आहेत.सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती, विद्यार्थ्यी तसेच वाहन चालकांना या मार्गावरुन प्रवास करणं धोकादायक बनले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी. अन्यथा केव्हाही आंदोलन केले जाईल, असा इशारा मांगवली ग्रामस्थांनी दिला आहे.
मांगवलीतील ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी मधुकर आयरे, वसंत नाटेकर, सचिन आयरे, प्रवीण राणे, अभिषेक गवाणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मांगवली गावातून तीन प्रमुख मार्ग जातात.त्यामध्ये मांडवकरवाडी पूल ते हेत शेवरीफाटा, गांगणवाड़ी ते पुनर्वसन तिठा, मांगवली तिठा मांडवकरवाडी पूल असे तीन प्रमुख रस्ते आहेत. हे तिन्ही मार्ग पुर्णतः नादुरुस्त झाले आहेत.या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत,तर काही ठिकाणी रसत्याच अस्तित्वात राहीलेला नाही. त्यामुळे येथून प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे.या नादुरुस्त मार्गामुळे अपघात होऊ लागले आहेत. अलिकडेच गावातील दोन तरुण खड्यात पडून जखमी झाले आहेत. रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे रहदारी जीवघेणी ठरत आहे. रुग्ण, वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती महिलांना वाहनांतून येताजाताना खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे एखाद्याची जीवही जाऊ शकतो, अशी भयानक अवस्था काही ठिकाणी पहायला मिळत आहे. मांगवली हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छोटी व्हॅन आहे. परंतु, या तिन्ही रस्त्यांवर येत्या काही दिवसांनी ही 'स्कूल व्हॅन' चालविणे जिवघेणे ठरणार आहे.
त्यामुळे गावातील प्रमुख तिन्ही रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत अन्यथा झोपी गेलेल्या जिल्हा व तालुका प्रशासनाला त्याला जागे करण्यासाठी मांगवली गावातील ग्रामस्थ केव्हाही आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.