
सावंतवाडी : नेमळे कौल कारखाना ते नेमळे तिठा दरम्यानच्या ६०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण अखेर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते, परंतु केवळ खडीकरण करून ते अर्धवट सोडण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते आणि वाहनचालकांना तसेच ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
नेमळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव, नेमळे ग्रामस्थ अरविंद राऊळ आणि महेश हवालदार यांच्या अथक प्रयत्नांमुळे या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नेमळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी रवी जाधव, अरविंद राऊळ आणि महेश हवालदार यांचे आभार मानले आहेत.