वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली : कवयित्री सरिता पवार

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 06, 2024 15:34 PM
views 50  views

कणकवली : वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली आहे. अभिजात मराठी भाषा, प्रमाण भाषा यासोबतच बोलीभाषांचेही महत्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले. बिडवाडी हायस्कुल च्या वतीने आयोजित मराठी भाषा  गौरव दिन कार्यक्रमात सरिता पवार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव साटम, माजी प्राचार्य गीता घाडी, विद्यमान प्राचार्य सुमुख जोशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सरिता पवार म्हणाल्या की नवोदित लेखकांनी सकस लेखनासाठी चौफेर वाचन करणे अत्यावश्यक आहे. ज्याद्वारे आपला भवताल लेखनात टिपून शब्दबद्ध करता येईल. आताची पिढी ज्या सहजतेने बोली भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करते ते कौतुकास्पद आहे. वाचन - लेखना साठी कोणतीही वाट न पाहता सुरुवात करा. मायमराठी च्या प्रवाहातील एक धागा व्हायचा प्रयत्न करा. माजी मुख्याध्यापिका श्रीमती गीता घाडी यांनी मराठीतील दिग्गज साहित्यिकांच्या साहित्य कृतींवर भाष्य करत त्यांचे मराठीतील योगदान विशद केले. विद्यार्थ्यांनी गितगायन, कविता सादरीकरण, नृत्य असे उपक्रम सादर करत मराठी भाषेला सलामी दिली. सूत्रसंचालन  शिक्षक शंकर रासम यांनी  , उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक -सुमुख जोशी यांनी केले.आभार लिपिक गणेश लाड यांनी मानले.