
सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी रिचर्ड डिमेलो यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच्या सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड झाली.
डॉ. सावंत यांनी आपला राजीनामा सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा राजीनामा मंजूर करण्यात आला. तसेच मंजुरीचा अहवाल जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. सरपंचपद रिक्त झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार विद्यमान उपसरपंच रिचर्ड डिमेलो यांची पुढील कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे, संतोष वेजरे, ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी, गीता कासार, माधवी भोगण, प्रज्ञा भोगण, उर्मिला मोर्य, विशाखा जाधव, मधु कुंभार, पूजा गावडे उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, शाम कासार, सुधीर वारंग, सचिन बिर्जे, रुपेश नाटकर व इतर ग्रामस्थांनी श्री. डिमेलो यांचे अभिनंदन केले.