
दापोली : पंचायत समिती दापोलीच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत दापोलीचे वनविभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने लावून धरली. या बाबत संघटनेने एक लेखी निवेदन देखील तटकरे यांना दिल्यावर तात्काळ तटकरे यांनी बैठकीतूनच वनविभागाचे कोल्हापूरचे वरिष्ठ अधिकारी यांना या अधिकारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव करा आशा सूचना केल्या आहेत. या आधी देखील या अधिकार्याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्या असून या बाबत योग्य कारवाई झाली नसल्याने शेवटी ही बाब शेतकऱ्यांनी खासदार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
तालुक्यातील किन्हळ येथील घरकुल लाभार्थी सुमित्रा कांबळे यांच्या घरकुल बांधणीत पंचायत समिती अधिकाऱ्यांनी त्रुटी काढून त्यांना घरकुल नाकारले या बाबत कांबळे यांनी आढावा बैठकीत येऊन सर्व माहिती पुरवली. या वेळी अधिक खर्च करून पंचायत समिती आवारात बांधलेले चार लाखाचे डेमो घरकुल आणि त्याला गेलेले तडे ही बाब या वेळी पत्रकारांनी खासदार यांचे निदर्शनास आणून दिली. स्वतः नियमबाह्य कामे करता आणि नागरिकांना त्रास देता तुमच्या नियमबाह्य कामांची मी चौकशी लावू का असे खासदार यांनी गटविकास अधिकारी मंडलिक यांना सुनावले. अधिकारी हे नागरिकांच्या सेवेसाठी आहेत त्यामुळे लोकांना वाट पहायला लावणे हे चांगल्या प्रशासनाचे काम नाही असे देखील तटकरे म्हणाले. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावामधील पाणी योजना अपूर्ण असूनहि या विभागाने आढावा बैठकीत ती कामे ५५ टक्के पूर्ण झाली असल्याचे कागदोपत्री दाखविले होते मात्र अनेक गावातील नागरिकांनी हि कामे अपूर्णच असल्याचे खासदार यांचे निदर्शनास आणून दिले. एका ठेकेदाराने त्याच्याकडे असलेली सुमारे ३३ गावातील पाणी योजना गेली ३ ते ४ वर्षे पूर्णच केलेल्या नसल्याने त्याला काळ्या यादीत टाकून ती कामे नवीन ठेकेदाराकडून करून घेण्यात यावीत अशा सूचनाही खासदार तटकरे यांनी दिल्या.
दापोली शहरातील पाण्याचाही प्रश्न यावेळी समोर आला होता. नगरसेविका साधना बोत्रे यांनी हा विषय या बैठकीत मांडला यावरून मुख्याधिकारी यांनीही प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन सुरू असून वेळप्रसंगी टँकरची तयारी ठेवली आहे अशी माहिती दिली. नारगोली बंधारा व कोडजाई नदी या दोन्ही ठिकाणाहून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली. तसेच अमृत २ अंतर्गतही पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शासनाच्या नव्या निर्देशानुसार बोरवेल मंजूर करण्याचे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यावेळी दापोली शहरात नवीन बोअरवेल प्रस्ताव तातडीने पाठवा जिल्हाधिकाऱ्यांना थेट मंजुरीचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच अमृत २ योजनेसाठी देखील प्रस्ताव तयार करून घ्या त्यासाठीही सहकार्य करतो, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दापोली शहर व तालुक्यातील बीएसएनएलचा भोंगळ कारभार याबाबतही खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत दापोली तालुका हा पर्यटन तालुका आहे महत्त्वाचे केंद्र आहे या ठिकाणी बीएसएनएलचे नेटवर्क बाबतीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. थेट बीएसएनएलचे कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून आपल्या मतदारसंघातून बीएसएनएलच्या परिस्थितीची पाहणी करावी अश्या सूचना दिल्या.
विधिमंडळ अधिवेशनात महसूल मंत्री यांनी सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास बंदी असल्याचे सांगूनही आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा केला जात असून. वाळूची वाहतूक करणारे डम्पर नागरिकांना दिसतात मात्र महसूल कर्मचार्यांना ते दिसत नाही. वाळू उपसा करणार्यावर महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याची माहिती पत्रकारांनी खासदार तटकरे यांना दिली त्यावर त्यांनी दापोलीचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांना वाळू उपसा कारवाई करण्याचे आदेश दिले. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे यांचेसह विविध खात्यांचे प्रमुख व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.