
सावंतवाडी : शिरोडा येथील ’प्रभू कोल्ड्रिंक्स’चे मालक व निवृत्त सावंतवाडी तालुकामास्तर अमरनाथ शांताराम प्रभू (७२) यांचे गुरुवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. माजी मुख्याध्यापिका सुप्रिया प्रभू यांचे ते पती तर पत्रकार कपिल प्रभू यांचे वडील होत. अमरनाथ प्रभू यांनी डिंगणे-सावंतवाडी येथील शाळेतून आपल्या शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. त्यांनी आरोस गिरोबा विद्यालय, कासार्डे नं. 1, साटेली तर्फ सातार्डा, कोलगाव नं. 1, माणगाव-तळीवाडी, सावंतवाडी तालुका स्कूलमध्ये सेवा बजावली. १९७५-७७ दरम्यान डिंगणे येथे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी सातवीचा वर्ग सुरू केला. प्रभू गुरुजींनी अनेक शाळांमध्ये शैक्षणिक उठावांतर्गत वस्तुरूपी देणगी मिळवून दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत तालुका आणि जिल्हास्तरावर यश मिळविले. २०१० मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. पतंजली योग समितीच्या माध्यमातूनही त्यांनी योगप्रसाराचे कार्य केले.