
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी - भटवाडी येथील निवृत्त केंद्रप्रमुख सरिता सुरेश मुननकर यांचा 'कर्तृत्ववान महिला' पुरस्काराने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निवृत्त लिपिक हेमा देसाई, भंडारी मंडळाच्या महिला अध्यक्षा शीतल नाईक, महिला वसतिगृहाच्या अध्यक्षा वैशाली पटेकर, माजी अध्यक्षा समता सूर्याजी आदी उपस्थित होत्या.
श्रीम. मुननकर मॅडम यांनी वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजेच १२ मार्च १९७४ साली वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार येथून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास सुरुवात केली. त्यानंतर शारदा विद्यालय तुळस, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल नं १, सातुळी नं १, कोलगाव निरुखे येथे ज्ञानदान केली. त्यानंतर पुन्हा वेंगुर्ला तालुक्यात होडावडे भोज येथे ज्ञानदान करून पुन्हा सावंतवाडी तालुक्यात कारीवडे नं. १ येथे ज्ञानदान केले. विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी कौटुंबिक संसाराचा गाढा हाकताना बी.ए. ची पदवी प्राप्त केली, तर २००७ साली वयाच्या ५२ व्या वर्षी बी.एड. देखील पूर्ण करून पारपोली शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून ज्ञानदानाच्या कार्यास सुरुवात केली.
त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला. २०१० पासून अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून तळवडे शाळेत कार्यरत राहिल्या. तर २०११ पासून 'केंद्रप्रमुख' या अधिकारी पदावर ते सावंतवाडी नं. १ या केंद्रावर काम पाहिले.
२०१३ साली नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यावर त्यांची जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सिंधुदुर्ग या संघटनेच्या कार्यकरिणीवर निवड झाली.त्यांच्या या दैदिप्यमान यशस्वी वाटचालीची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.