
शिवापूर : कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर (चाफेली) येथील सीताबाई रामा जंगले या वयोवृद्ध महिलेच्या घरात तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज पोहोचली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या 'जनता दरबार'मध्ये केलेल्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरात वीज आल्याने जंगले कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून जंगले कुटुंब वीज कनेक्शनसाठी पाठपुरावा करत होते, परंतु त्यात यश येत नव्हते. अखेर, त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारात आपली कैफियत मांडली. त्यानंतर, तात्काळ वीज वितरण प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि अवघ्या चार महिन्यांत रात्रंदिवस काम करून जंगले कुटुंबाच्या घरापर्यंत नवीन वीज लाईन टाकली. यासाठी आवश्यक असलेले खांबही उभारण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात वीज आल्याने सीताबाई जंगले यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद अमूल्य होता. या कामासाठी ज्यांनी सहकार्य केले, विशेषतः ज्यांच्या जमिनीतून वीज लाईन टाकण्यात आली, त्या सर्व जमीन मालकांनी कोणतीही अडचण न आणता आपली झाडे तोडून सहकार्य केले. त्यांचे आभार मानले जात आहेत.
या कामामुळे चाफेली गावाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, त्याबद्दल गावकरी समाधान व्यक्त करत आहेत. या कामात सरपंच दीप्ती सावंत, ग्रामपंचायत सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, माणगाव विभागाचे शाखा अभियंता शेळके, ठेकेदार पावसकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
जंगले कुटुंबाने खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आणि आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.










