
दापोली : राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सात बारा उतारा मोहीम सुरु केली असून, या मोहिमेला दापोली तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक जागामालक हे नोकरी व उदयोग व्यवसायानिमित्त शहरात रहात असून त्यातील अनेकांचे नातेवाईक मयत झालेले असूनही त्यांच्या सातबाराच्या उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करणे राहून गेल्याने वारसांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याने महसूल विभागामार्फत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दापोली तालुक्यातील अनेक गावात जिवंत सात बारा मोहीम सुरु करण्यात आली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेत सात बाराच्या उताऱ्यावरील ज्या व्यक्ती मयत झालेल्या आहेत, त्यांच्या वारसाकडून मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला तसेच विहित नमुन्यात अर्ज व स्वयंघोषणा पत्र घेऊन तो गावातील तलाठी यांचेकडे सादर केल्यावर त्यावर कायद्यानुसार विहित प्रक्रिया करून वारसाची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर केली जात आहे. दापोली तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २४ एप्रिल पर्यंत ६१९ अर्ज दाखल झाले असून त्यातील १७५ अर्ज मंजूर झाले आहेत. यात मयत खातेदारांची संख्या १ हजार ४४० असून वारसांची संख्या ५२० आहे.