
मालवण : मालवण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग ७ अ मध्ये भाजपचे उमेदवार युवा व्यावसायिक सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी घरोघर प्रचारावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य शासनाच्या योजना, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांसाठी आणलेल्या विविध योजनांची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. या प्रभागाचा विकास मागील ३० वर्षे दुर्लक्षित राहिलेला असून येथील विद्यमान लोकप्रतिनिधीला आपण सातत्याने संधी दिली. आता एकदा तरुण नेतृत्वाला संधी द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याची तिजोरी हातात असलेले आपले कार्यक्षम पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील सर्व समस्या दूर करण्याची ग्वाही सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.
शहरातील प्रभाग सातचे उमेदवार सौरभ ताम्हणकर यांनी नुकताच आपल्या प्रभागात प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी, हिंतचिंतक उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे उमेदवार ताम्हणकर व वायंगणकर यांनी सांगितले. प्रभागात फिरताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत आणि आम्हाला मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
यावेळी भाजप उमेदवारांकडून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या आवाहनाची पत्रके देण्यात आली. यात म्हटले आहे, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याशी प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधत मतदानासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, आपण सुज्ञ मतदारांनी नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पहिले खासदार म्हणून मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. तसेच जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार निवडून दिले. यामुळे आपण सर्वांनी मिळून जे विकसित भारताचे, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. ज्या विश्वासाने देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील जनतेने मतदान केले, आज तो विश्वास खरा ठरताना दिसत आहे. दोन्ही कार्यतत्पर नेत्यांच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार गतिमान पद्धतीने पुढे जाताना दिसत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास' हे ब्रीद वाक्य केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष कृतीत, प्रत्यक्ष अंमलात येत आहे. राष्ट्र नवनिर्माणच्या या प्रक्रियेत आपल्याला अजून अनेक टप्पे गाठायचे आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे. यासाठी आपलं 'मत' अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या मालवण या वैभवशाली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. आपणामुळे यापूर्वीही भारतीय जनता पक्षाला याठिकाणी संधी मिळाली. त्यातून येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेला दिलेली अभिवचने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मालवण हे शहर देशभरात नावारुपाला आले आहे. याच शिदोरीवर आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राला व्हिजनरी नेतृत्व लाभलेले आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांसोबत छोटी-छोटी शहरे सर्वांगाने विकसित करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
गेल्या वर्षभरातील त्यांच्या कामाच्या धडाक्याने मुंबई, ठाणे या शहरांकडे पाहिल्यावर त्याची प्रचिती येते. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी गेली चार दशके खर्ची घातली, जिल्ह्याला वेगळा नावलौकिक दिला, ते भाजपचे खासदार नारायण राणे, जेव्हा जेव्हा जिल्हयासाठी काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा या जिल्ह्याला झुकतं माप देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आपल्या उण्यापुऱ्या एक वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्याला अनेक सन्मान प्राप्त करून देणारे, जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे हे आमचे नेते आहेत. या मान्यवरांच्या नेतृत्वात मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही महिला भगिनी, युवामित्र यांच्यासह सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.










