
सावंतवाडी : श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग व स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव यांच्या संयुक्त विद्यमाने "राधाकृष्ण चषक २०२४" या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव येथे करण्यात आले होते. या अंतर्गत 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा' व 'सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा' घेण्यात आली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी श्रृती सडोलीकर, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार वीणा दळवी, वेतोबा देवस्थानचे मानकरी दादा प्रभूआजगांवकर, संजय पिळणकर, दशावतर कलावंत नारायण आसयेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल)' विभागात प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५०१/- व 'राधाकृष्ण चषक'चा मानकरी ठरली सावंतवाडीची सानिका संजय गावडे, द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली रत्नागिरीची तन्वी मंगेश मोरे तर तृतीय पारितोषिक रोख ₹ २५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली रत्नागिरीची सार्था नरेंद्र गवाणकर तर उत्तेजनार्थ प्रथम ₹१५०१/- सावंतवाडीची विधिता वैभव केंकरे तर उत्तेजनार्थ द्वितीय ₹११०१/- विजेता नाधवडे, वैभववाडीचा हर्ष संजय नकाशे ठरला. शास्त्रीय संगीतातील विख्यात गायिका विदुषी श्रुती सडोलीकर यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी स्पर्धक व संगीत साधकांना मार्गदर्शक अशी श्रुती सडोलीकर यांनी मुलाखत निवेदक संजय कात्रे यांच्या माध्यमातून घेण्यात आली. पारितोषिक वितरण सोहळा अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नारोजी, आणि देवस्थानचे मानकरी आणि परिक्षक महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
या सांगीतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित "सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा" छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड कोल्हापूरचे विश्वस्त संजय पाटणकर, राजगड रिसाॅर्टचे मालक प्रमोद नाईक, मराठी पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक संतोष दाभोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते श्रींची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ३००१/- व 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली रत्नागिरीची सार्था नरेंद्र गवाणकर तर द्वितीय पारितोषिक रोख ₹ १५०१/- व सन्मानचिन्ह खारेपाटणची कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई तर तृतीय पारितोषिक ₹१००१/-चा विजेता ठरला आजगांवचा कु. आराध्य आनंद खोत हे ठरले. उत्तेजनार्थ प्रथम ₹७०१ तुळस वेंगुर्ले येथील कु. ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल हिने मिळवला. सवेष साभिनय नाट्यगीत' मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ५००१/- व 'राधाकृष्ण चषक'चा मानकरी ठरला नेरूर कुडाळचा हर्षद प्रमोद मेस्त्री. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३००१ व सन्मानचिन्ह विजेती ठरली शिरोडा येथील कु. निधी श्रीकांत जोशी तर तृतीय पारितोषिक रोख ₹२००१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली वेंगुर्ले येथील कु. गीता सोपान गवंडे. रत्नागिरी येथून आलेली कु. तन्वी मंगेश मोरे उत्तेजनार्थ प्रथम ₹१००१/ची विजेती ठरली. तर तळवडे सावंतवाडीचा हेमंत हनुमंत गोडकर उत्तेजनार्थ द्वितीय ₹५०१/- पारितोषिकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे परीक्षणही विदुषी श्रुती सडोलीकर यांनीच केले. यावेळी त्यांनी स्पर्धकांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा परिक्षक विदुषी श्रुती सडोलीकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, अॅड. दिलीप ठाकुर, सौ. वीणा दळवी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम साहिल घुबे, ऑर्गन भालचंद्र केळुसकर बुवा तर तबला साथ गोवा येथील आदित्य तारी, प्रसाद मेस्त्री यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केलं. अनेक संगीत साधकांनी व संगीतप्रेमी रसिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व "राधाकृष्ण चषक २०२४" हा सांगीतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वाचे श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सचिव हेमंत दळवी यांनी आभार मानले.