पीएम विश्वकर्मा प्रशिक्षणास प्रतिसाद

प्रशिक्षणातून प्रगती साध्य करा : जिल्हाधिकारी किशोर तावडे
Edited by:
Published on: January 23, 2024 15:03 PM
views 91  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कोणत्याही व्यवसायात पारंगत होण्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे असते. आज तुम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणातून उद्योग व्यवसायाला भरारी देऊन प्रगती साध्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.

पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोस मधील आयटीआय मध्ये राज्यातील पहिल्या तुकडीचे शिवणकाम (टेलर) प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त  गणेश चिमणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री दामले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, या योजनेमुळे बारा बलुतेदारांमधील पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला अधिक वाव मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.  पहिल्या तुकडीला विणकामाचे प्रशिक्षण मिळाल्याने लाभार्थ्यांच्या व्यवसायात कौशल्य निर्माण होऊन व्यवसायाची भरभराट होणार आहे. प्रशिक्षण घेऊन गेल्यावर इतर महिलांना प्रशिक्षित करण्याचे आवाहन प्रशिक्षण पुर्ण झालेल्या महिलांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले.  

 सावंत म्हणाले, विश्वकर्मा येाजनेअंतर्गत देशात प्रशिक्षणाला सुरूवात झालेली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रशिक्षण घेणारी ही तुकडी राज्यातील पहिली तुकडी ठरली आहे. या प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांमध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे. या आत्मविश्वासातून व्यवसायाला नवी भरारी देण्याचे आवाहनही त्यांनी केले.