
सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज काॅलेज हाॅलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉपचे आयोजन केले होते. या कोचिंग वर्कशॉपला जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, पत्रकार विनायक गांवस, गोवा येथील जीएसटी कस्टम सुपरीटेंडंट मधुसुदन मर्तल यांच्या शुभहस्ते आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर व बुदधिबळ प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या उपस्थितीत वर्कशॉपचे उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली येथील ४२ मुला-मुलींनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी मधुसुदन मर्तल यांनी मनाच्या एकाग्रतेसाठी मुलांनी लहान वयात कॅरम व बुद्धिबळ खेळ खेळणे आवश्यक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी गायन, नृत्य, अभिनय या कलाप्रकारांकडे मुलांनी वळावं, असे आवाहन केले. तसेच विनायक गांवस यांनी मुलांसाठी सेमिनार, वर्कशॉप आणि स्पर्धा यांचं दरवेळी आयोजन करुन मुलांमध्ये आवड निर्माण करणा-या मुक्ताई ॲकेडमीचं कौतुक केले. पूर्वी खेळ, इतर उपक्रम यांचं मार्गदर्शन सहज मिळायचं नाही. आज मुक्ताई ॲकेडमीच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचा फायदा या मुलांना होतो, हे कौतुकास्पद असल्याचं नमूद केले. दरम्यान, बुद्धिबळ खेळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि विद्यमान विश्वविजेता डी.गुकेश यांच्या सोबत खेळलेल्या बाळकृष्ण पेडणेकर याने मुलांना बुद्धिबळचे प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी मुलांना कॅरमचे प्रशिक्षण दिले. यावेळी ॲकेडमीची तेरा वर्षीय राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदुरकर हिचा सत्कार करण्यात आला.
कौस्तुभ पेडणेकर यांनी पुढील महिन्यात कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. वर्कशॉपमध्ये सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. ॲकेडमीची राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू कु.गार्गी सावंत हीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.