वेंगुर्ल्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद..!

तालुका पत्रकार संघ, वेंगुर्ले न. प. व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: September 12, 2023 13:46 PM
views 83  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद,  तालुका पत्रकार संघ, लोकनेते अॅड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गर्दे नेत्र रुग्णालय  व कोकण कला व शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने सोमवार ११ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले न. प. च्या स्वामी विवेकानंद सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ८० जणांनी लाभ घेतला. 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक  मुख्याधिकारी परितोष कांकाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय पुनाळेकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार, जिल्हा रुग्णालयाच्या त्वचारोग तज्ञ डॉ. रुची शेता व इसीजी तज्ज्ञ डॉ. विशाल रेडी, होमिओपॅथीच्या डॉ. प्रणाली नाईक- सावंत, डॉ. रूपाली माळी, डॉ. श्रीराम हिर्लेकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध तेली, गद्रे नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोलकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, होमगार्डचे तालुका समादेशक संतोष मातोंडकर आदी उपस्थित होते. 

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांचे कुटुंबिय, नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी व तालुक्यातील होमगार्ड यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोफत अद्ययावत नेत्रतपासणी, महत्त्वाच्या सर्व तपासण्या जसे  ईसीजी, थायरॉईड तपासणी, कॅल्शियमची तपासणी, शुगर तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. 

मुख्याधिकारी यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी नगरपरिषदेतर्फे तीन वर्षाकरिता स्टार हेल्थ इन्शुरन्स काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली तसेच या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचार होणार असल्याचे सांगितले. तर आरोग्य तपासणी शिबीर सारखा स्तुत्य उपक्रम अल्पावधीत आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. या शिबिरात कोकण कला व शिक्षण विकास संस्था अंतर्गत हिंद लॅबकडून आरोग्य संदर्भात रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी भाजपाचे उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचीही मोलाची मदत लाभली. तालुक्यांतील सर्व पत्रकार, होमगार्डस व पालिका कर्मचारी यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. 

हे आरोग्य शिबिर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, होमगार्ड आणि पत्रकार यांच्यासाठी घेऊन आयोजकांनी आपली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ केली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. बातमीसाठी एकदा घराबाहेर पडल्यानंतर त्याचे घरी येण्याचा काळ हा अनिश्चितच. अशावेळी तहानभूक विसरून कार्यतत्पर असलेल्या पत्रकार बंधूनी आपल्या आरोग्य तपासणी सोबत स्वच्छता कर्मचारी व होमगार्ड यांच्या आरोग्य तपासणीचे आयोजन करून प्रिव्हेन्शन ईज बेटर दॅन क्युअर या उक्तीनुसार स्तुत्य उपक्रम राबविला आहे. असे प्रतिपादन  संजय पुनाळेकर यांनी केले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार यांनी ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या उपचारांबाबत माहिती दिली. तसेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रत्येकाचे असले पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्याची माहिती ऑनलाईन अपडेट राहू शकेल. सर्व शहरी विभागासाठी आपल्या ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य अकाउंट उघडले जाते. या आभा अकाउंट मुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्या व्यक्तीच्या आरोग्याचा इतिहास त्या त्या डॉक्टरला ऑनलाइनही मिळू शकेल. त्यासाठी प्रत्येकाने आपले आधार कार्ड सोबत ठेवावे व जो मोबाईल आधारशी लिंक आहे असा मोबाईल ठेवावा असे आवाहनही केले. कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे यांनी आपल्या एक रुपयात निदान व मार्गदर्शन असणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. होमिओपॅथी कॉलेजच्या वतीने डॉ. श्रीराम हिर्लेकर यांनी जुनाट रोगांवर तसेच  केस गळती सारख्या साध्या साध्या पटकन लक्षात न येणाऱ्या अशा अनेक रोगांवर होमिओपॅथी उपचारांसंबंधी माहिती दिली.  होमिओपॅथी दवाखान्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या उपचारांसंबंधी व विजिटर्स डॉक्टरांना संबंधी देखील माहिती दिली. प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर, निवेदन सहसचिव सीमा मराठे तर आभार प्रदर्शन सल्लागार के. जी. गावडे यांनी केले.