
सावंतवाडी : मंजूर रेखांकनातील रस्ता अडवल्याप्रकरणी सालईवाडा रहिवाशांनी सावंत बंधूंच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानच्या बाजूने महिला आश्रमच्या मागे सालईवाडा भागात जाणारा रस्ता गेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ वादात अडकला आहे. रहिवाश्यांनी यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलन केली. मात्र, प्रशासनाकडून योग्य ती दखल अद्याप घेतलेली नाही.याबाबत येथील रहिवाशांनी जागेचे भूतपूर्व जमीन मालक कै.सुखदेव बापू सावंत यांचे चिरंजीव विनोद सावंत व प्रसाद सावंत यांना समज देणे व पुन्हा रस्त्यावर अटकाव करण्यास मज्जाव करण्याकरिता येथील रहिवाशांनी सह्यांचे निवेदन सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिले आहे. दरम्यान, या जागेत पोस्ट कार्यालय आरक्षीत असून जागा संपादित केलीय. तेथे कार्यालय देखील उभं राहील असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या जमिनीत अतिक्रमण केले जात असल्याची तक्रार विनोद सावंत यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर आता येथील रहीवाश्यांनी देखील पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.










