मराठा समाजाला दिलेले आरक्षण म्हणजे दिशाभूल : सतीश सावंत

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 21, 2024 05:25 AM
views 102  views

कणकवली : सिंधुदुर्गात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी ३१ मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे, मात्र या भरतीसाठी आवश्यक असलेले मराठा समाज दाखला तसेच नॉन क्रिमीलेअर दाखला मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याचाच अर्थ राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण म्हणजे केवळ दिशाभूल  आहे.मराठा आरक्षणचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची फसवणूक महायुती सरकारने केल्याचा आरोप शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला.शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून येत्या दोन दिवसात सदरचे दाखले प्राप्त न झाल्यास १ एप्रिलला सरकार विरोधात एप्रिल फुल आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत बोलत होते. यावेळी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रवी गावडे उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र आपले सरकार पोर्टलवरून मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाज आरक्षण लाभ मिळवून देणारा दाखला मिळत नाही आहे. 

सिंधुदुर्गात पोलीस भरतीसाठीच्या उमेदवाराना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही. पोलीस भरतीची अंतिम तारीख 31 मार्च आहे त्यामुळे आता केवळ दहा दिवस शिल्लक राहिले आहेत पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून येत्या दोन दिवसांत आपले सरकार पोर्टल वरून हे दाखले  देण्यात यावेत.दाखले न मिळाल्यास आचारसंहिता काळात मोर्चे आंदोलन करता येत नसले तरी 1 एप्रिलला सरकार विरोधात एप्रिल फुल आंदोलन करणार असल्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला. 

पोलीस भरतीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आरक्षणचा लाभ मिळण्यासाठी नॉन क्रिमिलेअरचा दाखलाही मिळत नाही आहे. खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी भागात आवश्यक नॉन क्रिमिलेअर दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दखल घेत तात्काळ आपले सरकार पोर्टलवर आरक्षणचा लाभ मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी , तसेच ऑनलाइन माध्यमातून दाखवले देण्यास अडथळे निर्माण होत असतील तर ऑफलाइन दाखवले देऊन उमेदवारांची गैरसोय दूर करावी असे आवाहन सावंत यांनी केले.