
कणकवली : प्रचंड उत्सुकतेने भरलेल्या वातावरणात कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया बुधवारी सकाळी कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. अवघ्या पाऊण तासामध्ये आरक्षण प्रक्रिया संपली. आरक्षण प्रक्रियेत अनेक इच्छुकांचे पत्ते कट झालेत तर अनेकांना संधी प्राप्त झाली आहे. अर्थातच वेगवेगळ्या पक्षांच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर हिरमोड दिसत होता.
आरक्षण प्रक्रिया कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्यांच्या माध्यमातून ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
अशी झाली आरक्षण प्रक्रिया
आरक्षण प्रक्रियेची सुरुवात अनुसूचित जातींच्या प्रभागातून करण्यात आली. नियमानुसार अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले ८ व११ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव केले गेले. त्यानंतर चिठ्ठीद्वारे अनुसूचित जाती सर्वसाधारण व अनुसूचित जाती महिला असे प्रभाग ठरविण्यात आले. पुढे ओबीसी प्रवर्गातील पाच प्रभाग चिठ्ठ्यांद्वारे निश्चित करण्यात आले. त्यातील तीन प्रभाग चिट्ठ्यांद्वारेच ओबीसी महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले. उर्वरित दहा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी असल्याने त्यातील पाच प्रभाग खुला प्रवर्ग महिला याकरिता चिठ्ठ्यांद्वारे निवडण्यात आले व ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. तर आरक्षण प्रक्रियेबाबत हरकती असल्यास त्या ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करता येणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले
अनेकांना नवीन प्रभाग शोधावा लागणार
या आरक्षण प्रक्रियेत गतवेळी किंवा त्यापूर्वीही आपल्या प्रभागातून निवडणूक लढविलेल्या अनेकांचा यावेळी आपल्या प्रभागातील पत्ता कट झाला आहे. यामध्ये नगरपंचायतीचे गतवेळचे विरोधी पक्षनेते सुशांत नाईक, गतवेळचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माझी बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले आदींचा समावेश आहे. उबाठा शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे नाईक यांची नगराध्यक्ष होण्याची संधी हिरावली गेली. आता तर त्यांचा प्रभागही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे नाईक यांना नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायची असल्यास अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. गतवेळचे उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्याही प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. हर्णे मागील पंधरा वर्षे नगरसेवक होते. तर आता पुन्हा नगरसेवक व्हायचे असल्यास त्यांना अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. अबिद नाईक यांच्या प्रभागातही ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. तर गतवेळचे नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अॅड. विराज भोसले यांनाही आरक्षणाचा फटका बसला असून त्यांनाही नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.
आरक्षण प्रक्रियेसाठी मोठी उपस्थिती
आरक्षण प्रक्रियेसाठी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी, कणकवली शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, कणकवलीकर नागरिक उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यावरच लढणार : नलावडे
भाजपच्या वतीने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, मागील पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात आम्ही शहरामध्ये विविध विकासकामे केलेली आहेत. तर आमचे नेते नितेश राणे हे पालकमंत्री झाल्यानंतर कणकवली शहरात विकासासाठी खूपच मोठ्या प्रमाणात निधी मिळाला व त्यातून अनेक कामे मार्गी लागली. हे विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी कोणते उमेदवार असणार, याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील व तो आम्हाला मान्य असेल असे नलावडे म्हणाले.
कणकवलीकर आमच्या सोबत : पारकर
उबाठा शिवसेनेचे कणकवली तालुका प्रमुख तथा कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत उबाठा शिवसेना नेहमीच दक्ष राहिली आहे. सत्ताधारी चुकीच्या गोष्टी करत होते, त्याला आम्ही वेळोवेळी कडाडून विरोध केला आहे. आमचे नेते उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यानुसारच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मात्र आमच्याकडे नगराध्यक्ष व 17 ही प्रभागांमध्ये नगरसेवक पदांसाठी अनेक इच्छुक आहेत. गतवेळच्या सत्ताधाऱ्यांनी शहराचा काय विकास केला आहे, याची कणकवलीकरणही कल्पना आहे. त्यामुळे या निवडणुकीत कणकवलीकर आमच्या सोबत राहतील असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.
हे आहे आरक्षण
प्रभाग १ : सर्वसाधारण
प्रभाग २ : सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ : सर्वसाधारण
प्रभाग ४ : ना.मा.प्र. महिला
प्रभाग ५ : ना.मा.प्र. महिला
प्रभाग ६ : सर्वसाधारण महिला
प्रभाग ७ : ना.मा.प्र. महिला
प्रभाग ८ : अनुसूचित जाती
प्रभाग ९ : सर्वसाधारण महिला
प्रभाग १० : सर्वसाधारण महिला
प्रभाग ११ : अनुसूचित जाती महिला
प्रभाग १२ : सर्वसाधारण महिला
प्रभाग १३ : ना.मा.प्र.
प्रभाग १४ ना.मा.प्र.
प्रभाग १५ : सर्वसाधारण
प्रभाग १६ : सर्वसाधारण
प्रभाग १७ : सर्वसाधारण
आरक्षण प्रक्रियेसाठी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी, कणकवली शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, कणकवलीकर नागरिक उपस्थित होते.










