LIVE UPDATES

देवगड सरपंचपदाची आरक्षण सोडत १५ जुलैला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 09, 2025 20:56 PM
views 50  views

देवगड : देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालय देवगड येथे काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी पुन्हा नव्याने आरक्षण निश्चीत करण्यात येणार आहे. यापूर्वी ८ एप्रिल रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शासनाच्या नव्या आदेशामुळे आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. 

तालुक्यातील ७२ पैकी ३७ ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार आहेत. उर्वरित ३५ ठिकाणी पुरुषांना सरपंच होण्याची संधी आहे. ५ मार्च २०२५ ते २०३० या पाच वर्षांत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यात अनुसुचित जातीतील महिलांसाठी २, अनुसुचित जमातीतील महिलांसाठी १, ओबीसींत ९ महिलांसाठी आणि खुल्‍या प्रवर्गातील महिलांसाठी २४ अशी एकूण ३७ सरपंच पदे  महिला प्रवर्गासाठी आरक्षित केली जाणार आहेत. उर्वरीत ३५ सरपंच आरक्षित पदांमध्‍ये अनुसुचित जातीसाठी २, नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी १० व खुल्‍या प्रवर्गासाठी २३ सरपंचपदे आरक्षित करण्यात येणार आहेत. २०११ ची १ लाख ०४ हजार ९५२ लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी प्रवर्ग निहाय सरपंच पद निश्चिती व माहितीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.