दैव बलवत्तर म्हणून बचावले !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 30, 2023 16:07 PM
views 513  views

मालवण  : मालवण-कसाल मार्गांवरील कुणकावळे येथील कुपेरी घाटीत शुक्रवारी रात्री चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात झाला. या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर बचावले. मात्र, या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अशी माहिती की, हा ट्रक (KA-31-7165) नेहमीप्रमाणे चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करायचा. शुक्रवारी रात्री नऊ वाजता चिरे भरून चौकेतून निघालेला ट्रक कुपेरी घाटी उतरत असताना अचानक ट्रकमध्ये बिघाड झाल्याने ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. हा अपघात दूचाकीने मालवण येथे जाणारे कट्टा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी चीपकर यांच्या अगदी समोरच घडला. एवढा मोठा भीषण अपघात होऊनही ट्रकमधील चालक- क्लिनर तसेच अपघाताच्या स्थळी समोरच दुचाकीवर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले. त्यांनी अपघातातील चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढून धीर देत बाजूला केले. अजून थोडा जरी वेळ आतमध्ये अडकले असते तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता. मात्र, पोलीस कर्मचारी चिपकर हे देवदूता सारखे धावले आणि त्यांचे प्राण वाचवले.