भूमी अभिलेख उपअधिक्षकांच्या विरोधात तहसिलदारांकडे निवेदन

Edited by: मनोज पवार
Published on: September 27, 2024 11:00 AM
views 144  views

मंडणगड : उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मंडणगड यांनी हलगर्जीपणाने विनाकारण मोजणी कामी उपस्थित राहण्यासाठी नोटीस देऊन नाहक त्रास देत आर्थिक नुकसान केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी गणेश चौगुले, अनिल कदम शिरगाव, सुधीर कदम सोवेली या जमीन मालकांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकाऱी रत्नागिरी यांच्याकरिता मंडणगड तहसिल कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनातील माहीतीनुसार 3 सप्टेंबर 2024 रोजी नमुद तिनही जमीन मालकांना उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मंडणगड यांची हद्द कायम मोजणीस नोटीस प्राप्त झाली होती. नमुद जमीन मालक यांचे मुळगाव शिरगाव व सोवेली असले तरी सध्या ते रोजगाराकरिता पुणे व मुंबई येथे रहात असून मोलमजुरी करुन त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाहन करीत आहेत.

उपअधिक्षक भूमी अभिलेक कार्यालय मंडणगड यांनी कागद पत्रांची तपासणी न करता व तक्रादरांचा कोणताही संबंध नसताना मौजे शिरगाव तालुका मंडणगड येथील गट नंबर 607 चे मोजणी कामी उपस्थित राहणेकरिता नोटीस देऊन 23 सप्टेंबर 2024 रोजी हजर सांगीतले. कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे नमुद जमीन मालक हे त्यांचा रोजगार बडवून मोजणीकामी हजर राहीले. यावेळी मोजणी अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता तुमचा याच्याशी संबंध नाही असे मोजणी अधिकारी श्री. जे.एस. गलांडे यांनी सांगीतले. मोजणीशी काहीही संबंध नसताना आम्हाला रोजगार बडवून स्वखर्चाने मुंबई व पुणे येथून शिरगाव येथे हजर रहावे लागले. कार्यालयाच्या हलगर्जीपणाचा आम्हाला नाहक त्रास झाला व आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी अशा बेजबाबदार व हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन आमच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर गणेश चौगुले, अनिल कदम, सुधिर कदम यांच्या सह्या आहेत.