
सिंधुदुर्ग : स्वप्निल परब :सह्याद्रीच्या कडीकपारीत स्वत:ची एक वेगळी ओळख सांगणारे हे गाव. सैनिकांचे गाव, तंटामुक्त गाव, वैभवशाली गाव अशी बिरूदे या गावासाठी लावतात. समृद्ध परंपरा जीवनव्यवस्थेला स्थिर बनविताना निसर्गाशी एकरूप झालेले राज्यातील एकमेव गाव, अर्थात सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ! हा भाग दुर्गम, पण नित्य आनंददायी संगम! येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौकुळ नं. ४ मध्ये ‘आनंददायी शनिवार’ मुलांना नित्यानंद देणारा ठरला, तो येथील शिक्षक जावेद तांबोळी यांच्या कल्पक उपक्रमातून! या शनिवारी त्यांनी मुलांना चक्क ‘रिपोर्टर’ बनविले. आणि छोट्याशा वृत्तातून मुलांचे व्यक्तीमत्त्व वृद्धींगत करताना गावचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक़ वारसा उलगडून दाखविला. तांबोळी यांच्या या उपक्रमाचे कौतुक झालेच पण मुलांनी बनविलेला हा रिपोर्ट ‘सर्च रिपोर्ट’ बनून राहिला.
चौकुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावगाड्याचा आणि माणूसकेंद्रित दरडोई सुबत्तेचा निखळ निर्झर झरा. प्रत्येक कुटुंबातील एक-दोघांची पावले दर मंगळवारी दुपारी गावातील सातेरी मंदिराकडे आपोआप वळतात, त्यात महिलांचाही समावेश असतो. तेथे गावकी भरून गावाच्या समृद्ध विकासाचे तरंग उमटतात. त्यातील न्यायाचे झंकार आणि भविष्याच्या विकासाचा नाद व गुंजन शेकडो वर्षे नुसता सुरु नसून तो समृद्धही होत आहे.
आनंददायी शनिवार ठरला लक्ष्यवेधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौकुळ नं. ४ मध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत शिक्षक जावेद तांबोळी यांनी एक वेगळा उपक्रम राबवून मुलांना उद्युक्त केले. बातमी कशी असते, ती लोकांपर्यंत कशी पोहोचविली जाते, बातमीचे संकलन कसे होते, ती सांगताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात, बातमीचे इम्पॅक्ट काय असते याबाबत माहिती देतानाच तांबोळी यांनी मुलांना सरपंच आणि माजी सैनिकांची मुलाखत घेण्यात भाग पाडले. यातून ज्ञानार्जन तर झालेच पण मुलांमधील आत्मविश्वास बळावला. दुर्वेश गावडे, अथर्व गावडे, आरोही गावडे, अन्विता गावडे, गोविंदराज गावडे या मुलांनी यात सहभाग घेतला. अवघ्या सहा मिनिटांतच त्यांनी चौकुळ गावची व्यवस्था लोकांसमोर आणली. दुर्वेश गावडे याने स्वातंत्र्यसैनिक गावडे काका यांची मुलाखत तसेच सरपंच सतिश शेटवे यांची मुलाखत घेतली.
सरपंच सतिश शेटवे यांनी मुलांना मुलाखत देताना म्हटले, गावात एकही अशी घटना नाही, की जी पोलीस स्टेशमध्ये गेली आहे. चौकुळ गावाची निर्मिती झाल्यापासून ही परंपरा सुरू आहे. कबुलायतदार व्यवस्थेवर आपल्याला विश्वास आहे. सर्वात वाद हे जमिनीमुळे होतात, मात्र येथे कबुलायतदार जमीन असल्यामुळे वाद नाहीत. सगळे वाद, तंटे, समस्या देवळातच होतात. त्यामुळे कबुलायतदार गावकरच जमीन राहणे योग्य आहे. चौकुळ गावातील १०० सैनिक ऑन ड्युटी सध्या आहेत, असे स्वातंत्र्यसैनिक गावडे यांनी सांगितले. चौकुळ गावाची शिस्त आणि ऐक्य यातून प्रतिबिंबीत झाले.
स्वत:च्या व्यवस्थेवर श्रद्धा
राजेशाही गेली, संस्थानिक गेले, आता सरकार आले; पण सिंधुदुर्गातील चौकुळ गावचा गावगाडा तिथले लोकच चालवतात. पिढ्यानपिढ्या जपलेल्या त्यांच्या स्वतःच्या या व्यवस्थेवर आजही गावकऱ्यांची तेवढीच गाढ श्रद्धा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चौकुळ गावाने जपलेली ही ‘कबुलायतदार गावकर व्यवस्था’ आजही या गावाला एकतेच्या घट्ट बंधनात गुंफून आहे. याबद्दल विद्यालयाचा विद्यार्थी दुर्वेश गावडे याने विस्तृत माहिती दिली.
सह्याद्रीच्या रांगेत, आंबोलीच्या शेजारी असलेले चौकुळ हे देखणे गाव. या गावाला ‘सैनिकांचे गाव’ अशी ओळखही आहे. पण त्याहीपलीकडे शेकडो वर्षापासून या गावाने स्वतःची ही व्यवस्था योजली आहे. येथील प्रत्येक निर्णय हा गावकरी एकत्र येऊन घेतात. त्यासाठी दर आठवड्याला गाव बैठक होते. या बैठकीत औताचे दर, चराई शेत्र, शेतीचे क्षेत्रविकास कामाचे निर्णय, तंटे सोडविण्याबरोबरच शेतमजुरीचे दर, इतकच काय तर कोणी कुठे घर बांधायचे याचे निर्णयही सर्वसंमत्तीपूर्वक घेतले जातात. ‘गावकी’ या नावाने ओळखली जाणारी ही सभा दर मंगळवारी भरते. त्यामुळे या सर्व व्यवस्थेला कबुलायतदार गावकर म्हणून ओळखले जाते.
राज्यात एक वेगळा आदर्श !
‘चराईबंदी क्षेत्र’ अनेक वर्ष येथे राखले जाते. चारा यायला लागला की, कबुलायतदार गावकर चराईबंदीचा क्षेत्र निश्चित करतात, त्याला आराखडा म्हणतात. येथील चराईबंदी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत उठवली जाते. अनेक पिढ्यांपासून येथे कुऱ्हाडबंदी ही आहे. त्याचे क्षेत्र निश्चित केले जाते. दरवर्षी ‘नाचणी शेतीचे’ ठिकाण ठरवून तेथे कुऱ्हाड बंदी उठवली जाते. याबाबतचे निर्णयही गावकी घेते. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या या व्यवस्थेमुळे गावाची रचना शिस्तबद्ध आहे. इतर गावांच्या तुलनेत या गावात कित्येक पटीने एकजूट आहे. या घट्ट एकीमुळेच हे चौकुळ गाव आता ग्राम पर्यटनात वेगाने आपली प्रगती करीत आहे.