
दोडामार्ग : तालुक्यातील पडवे माजगाव ते कुंब्रल पर्यंत रस्त्याची अत्यंत वाताहात झाली असून खड्ड्यात गेलेल्या या रस्त्याची येत्या 10 एप्रिल पूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अन्यथा उपोषण आंदोलन छेडू, असा आक्रमक पवित्रा तळकट गावचे सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी दिला आहे.
याच संदर्भात लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदचे शाखा अभियंता अमित कल्याणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी ग्रामस्थांची व्यथा त्यांच्याकडे मांडली आहे. इतकच नव्हे तर रस्ता दुरुस्ती न झाल्यास 11 एप्रिल रोजी छेडण्यात येणाऱ्या उपोषणाचं इशारा पत्र श्री कल्याणकर यांच्याकडे ग्रामस्थांच्या उपस्थित सरपंच सावंत भोसले यांनी दिल आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पड़वे माजगाव ते तळकट सोसायटी, तळकट तिठा ते कुंबल पर्यंत जाणाऱ्या रस्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालवणे खूप धोक्याचे बनले आहे. या मार्गावर वाहन चालवताना अपघात पण झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची डाक दोजी व नव्याने डांबरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे तत्पूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने 10 एप्रिल 2023 पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती सुरू करावी अन्यथा सकाळी 10 वाजल्या पासून तळकट पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तळकट सोसायटी येथे उपोषण करण्यात येईल असा इशारा सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी दिला आहे.