
वैभववाडी : शहरातील छत्रपती संभाजी चौकात अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. या वाहनांमुळे याठिकाणी असलेला सेल्फी पॉइंट झाकोळला जात आहे. त्यामुळे या भागात पार्किंग होणा-या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाने पोलीसांकडे केली आहे.
शहरातील संभाजी महाराज चौकात न.प.ने सुमारे साडे नऊ लाख रुपये खर्चून सेल्फी पॉइंट उभारला आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. परंतू गेल्या काही दिवसांपासून या सेल्फी पॉईंटच्या सभोवताली तीन, सहा आसनी रिक्षा, टेम्पो सहीत इतर वाहने पार्किंग केली जातात. यामुळे हा पाँइंट पुर्णपणे झाकोळला जातो. यामार्गावरून येणाऱ्या पर्यटकांना हा सेल्फी पॉइंट दिसत नाही.
तसेच या भागातील अनाधिकृत वाहनतळामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. तसेच येथील पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन न.प.ने पोलीसांना पत्र दिले आहे. या पत्रात अनाधिकृत पार्किंगवर कारवाईची मागणी केली आहे.