
सावंतवाडी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर देखील उपस्थित होते. गोवा व सिंधुदुर्गच नातं अधिक घट्ट करण्यासह विविध विकासात्मक विषयांवर यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली.
मोपा इंटरनॅशनल विमानतळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना संधी मिळावी यासाठी ही भेट घेण्यात आली. पेडणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना मोपा येथे प्राधान्य द्यावं अशी मागणी यावेळी केली. गोवा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देत पेडणे व सिंधुदुर्गच्या लोकांना मोपात प्राधान्य देणार असल्याचं कबुल केलं. याचबरोबर गोवा मेडिकल कॉलेज बांबुळी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी साकारात्मकता चर्चा झाली. सिंधुदुर्गकरांच्या चांगल्या आरोग्यसेवेबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिल. तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये देखील येत्या ३ महिन्यात जिल्ह्यातील रूग्णांना चांगली सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितल. भाजपच्या नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार मानले.यावेळी सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, पेडण्याचे आमदार प्रविण आर्लेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.