कृषी सहाय्यकांची कामांकडे टाळाटाळ

सरपंच महेश गुरव यांनी घेतली अधिका-यांची भेट !
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 18, 2023 19:40 PM
views 212  views

कणकवली : आशिये गावातील शेतक-यांना योग्य मार्गदर्शन व शासनाच्या विविध योजनांबाबत कृषी विभागामार्फत माहिती दिली जात नाही. कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक गावातील शेतक-यांना भेटत नाहीत. योग्य ते मार्गदर्शन करत नाहीत. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने आशिये गावात कृषी सहाय्यकांनी संपर्क ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र, या सर्व कामांकडे कृषी सहाय्यक टाळाटाळ करीत आहेत. तालुका कृषी विभागाची यंत्रणा जर व्हेंटिलेटरवर असेल तर याबाबत आमदार नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सरपंच महेश गुरव यांनी दिला आहे.

भुईमुग बियाणे आशिये गावातील शेतक-यांना किती देणार ?  अशी विचारणा आशिये सरपंच महेश गुरव यांनी तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांना केली. तेव्हा कृषी सहाय्यकांनी मागणी केली नाही. तरीही आशिये गावाला कृषी विभागामार्फत २ हेक्टर प्रात्यक्षिकासाठी भुईमुग बियाणे दिले जाईल असे आश्वासन कृषी अधिकारी यांनी दिले. तसेच संबंधित कृषी सहाय्यकांना कामकाजाबाबत सक्त सुचना देत वैयक्तिक अडचणी असल्यास बदली करुन घ्या असे सांगितले. यावेळी  उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 आशिये गावात वायंगणी शेती केली जाते तरी देखील शेतक-यांना आवश्यक असलेला सल्ला देण्यासाठी कृषी सहाय्यकांनी काम करण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात कृषी सहाय्यक शेतक-यांच्या संपर्कात नाहीत. ज्या शासनाच्या योजना आहेत त्याबाबत जनजागृती शेतक-यांमध्ये कृषी सहाय्य्क करत नाहीत. त्यांचे वरीष्ठ कृषी पर्यवेक्षक यांचे कृषी सहाय्यकांवर नियंत्रण नाही. त्यामुळे आशिये गावातील शेतक-यांना न्याय कसा मिळणार ? असा प्रश्न सरपंच महेश गुरव यांना तालुका कृषी अधिका-यांना विचारला. त्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक यांना याबाबत सक्त सुचना तालुका कृषी अधिकारी श्रीम. मुळे यांनी देत पुढील काळात शेतक-यांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येता कामा नये. शेतक-यांशी संपर्क ठेवून योजनांची माहिती द्या, जर संबंधित गावांमध्ये कामाची जबाबदारी जमत नसेल तर वरीष्ठ कार्यालयाकडून आपली बदली कार्यालयात करुन घ्या असे सांगितले.