
दोडामार्ग : गेल्या वर्षी सुद्धा हिंदूच्या पवित्र सण गणेशचतुर्थी पूर्वी दोडामार्गमध्ये आरटीओकडून सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या अडवून वसुली सुरु होती. चतुर्थी सण साजरा करण्यासाठी पगार झाला नसेल तर सांगावे. जर एवढीच कारवाई करण्याची खुमखुमी असेल तर अवैध खनिज वाहतुकीच्या गाड्या कशा फिरतात असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे.
जर नाहक त्रास नाही थांबला तर कार्यालयातघुसून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. महत्वाचे म्हणजे याबाबत श्री. धुरी हे आरटीओचे अधिकारी यांना दोडामार्गात भेटले असता आम्ही कारवाई करणारच आम्हांला वरिष्ठ अधिकाऱ्याना पैसे द्यावे लागतात असे उत्तर मिळाल्याचे सांगत आरटीओच्या कार्यपद्धतीवर श्री. धुरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
पत्रकारांना माहीती देताना श्री. धुरी पुढे म्हणाले, गणपती सणाच्या खरेदीसाठी चाकरमानी येण्यास सुरुवात झाली आहे शिवाय दोडामार्ग तालुक्यातील जवळ गोवा राज्यातील काही गाव दोडामार्ग बाजारपेठेवर अवलंबून आहेत. ही बाब आरटीओ विभागाला माहिती आहे म्हणून गेल्यावर्षी याचवेळी त्यांनी कारवाई सुरु केली होती. दोडामार्ग तालुक्यातीलही अनेकांच्या गाड्या जीए पासिंग आहेत. आरटीओने नको तिथे येऊन वसुली करू नये. हिंदू सणावेळी बाजारपेठ परिसरातील गर्दी पाहुन आरटीओच्या गाड्या फिरतात असा आरोपही श्री. धुरी यांनी केला आहे. शिवाय तातडीने कारवाई थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्याकडे अनेक त्रस्त वाहनचालक येऊन त्यांनी ही माहिती दिली असल्याचे सांगितलंय.