वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’

Edited by: मनोज पवार
Published on: October 16, 2025 15:14 PM
views 26  views

गुहागर : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्रीपति इमारतीतील संगणक केंद्र येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम आणि सरस्वती देवतेच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. गणेश दिवे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार होते. तसेच महाविद्यालय समन्वयक हृषिकेश गोखले यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

प्रथम वर्षाची विद्यार्थिनी जान्हवी मायदेव हिने सरस्वती वंदना सादर करून आपल्या मधुर स्वरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थी सादरीकरणांत आदित्य घाणेकर याने प्रभावी भाषण केले. वेदिका सकपाळ व जान्हवी मायदेव यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला. ग्रंथालय विभागाचे कनिष्ठ लिपिक दिनेश खेडेकर यांनी आपल्या अनुभवातून वाचनाचे जीवनावर होणारे परिणाम प्रभावी शब्दांत मांडले. "वाचन हे फक्त छंद नसून आयुष्य बदलण्याचे बळ आहे," असा विचार मांडला.

मुख्य व्याख्यानात डॉ. गणेश दिवे यांनी ‘वाचनाची ताकद आणि कलामांची प्रेरणा’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयीचे दीर्घकालीन शैक्षणिक आणि वैचारिक फायदे समजावून सांगितले. त्याचसोबत त्यांनी महाविद्यालयीन वार्षिक अंकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “हा अंक केवळ विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीचा आरसा नाही, तर संस्थेच्या बौद्धिक संस्कृतीचा दस्तऐवज आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखन, संशोधन आणि सामाजिक भान जोपासण्याचे आवाहन केले. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अविनाश पवार यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांचे प्रेरणादायी दर्शन घडविले. त्यांनी सांगितले की, “डॉ. कलाम यांचे जीवन हे स्वप्न पाहण्याचे, त्या स्वप्नांसाठी अविरत परिश्रम करण्याचे आणि त्यांना वास्तवात आणण्याचे प्रतीक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, विचार आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी महविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सांघवी तांबे व कु. श्वेता कदम यांनी उत्तमरित्या पार पाडले. आभार प्रदर्शन ग्रंथालय परिचर सौ. देविका झगडे यांनी केले. कार्यक्रमाचे निवडक क्षण कॅमेराच्या माध्यमातून प्रयोगशाळा सहाय्यक क्षितीज शेवडे यांनी अत्यंत कौशल्यपूर्णरीत्या टिपले. शेवटी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील समर्थ राणे या विद्यार्थ्याने ‘पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.