वाचनामुळे समाजाचा बौद्धिक, मानसिक व भावनिक विकास होण्यास मदत होते : प्राचार्य डॉ. राहूल जाधव

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विद्याथ्र्यांनी घेतला ‘ग्रंथ प्रदर्शना’चा लाभ
Edited by:
Published on: October 16, 2024 05:18 AM
views 151  views

मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात नुकतीच सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या सहकार्याने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते.  यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, प्रा. संजयकुमार इ्रंगोले, डॉ. धनपाल कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णू जायभाये, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. सुरज बुलाखे, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. महादेव वाघ, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ.राहूल जाधव यांचे हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी ग्रंथपाल  डॉ.दगडू जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी ‘वाचन प्रेरणा दिना’चे महत्त्व विशद करताना  विद्याथ्र्यांनी आपल्या जीवनात वाचनाला महत्व देणे अत्यंत आवश्यक  असल्याचे सांगितले. 

यावेळी प्राचार्य डॉ. राहूल जाधव विद्याथ्र्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाले की, वाचनामुळे समाजाचा बौद्धिक, मानसिक व भावनिक विकास होण्यास मदत होते.आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत वाचन संस्कृती समृदध व बळकट होण्याच्या अनुषंगाने माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वाचनातून वाचकाला बहुश्रुतता प्राप्त होते तसेच वाचकाचा व्यक्तिमत्व विकास होतो.  तसेच वाचनातून सामाजिक, सांस्कृतिक दृष्टया समृद्ध समाज निर्मिती होते. या सर्व बाबीचा विचार करता  वाचन संस्कृती टिकवायची व वाढीस लावायची असेल तर विद्याथ्र्यांमध्ये वाचनाचे महत्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्यात ‘वाचनाची आवड’ निर्माण करणे आवश्यक  असल्याचे सांगितले. यावेळी विद्याथ्र्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद घेतला. सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.  विष्णू  जायभाये यांनी मानले.